*शासकीय योजनांचा लाभ घेऊन करिअर घडवावे : आ.धर्मराव बाबा आत्राम*

30

*शासकीय योजनांचा लाभ घेऊन करिअर घडवावे : आ.धर्मराव बाबा आत्राम*

 

*छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उदघाटन*

 

 

अहेरी:-विद्यार्थ्यांनी परिश्रम करून कौशल्य आत्मसात करावे.आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडून त्यात प्राविण्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावे. उद्योजक होण्यासाठी शासनाच्या अनेकविध योजना असून युवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले करिअर घडवावे, असे आवाहन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आलापल्ली येथे 2 जून रोजी आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अहेरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी एन सी दाते होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी,गडचिरोली वैभव बोनगीरवार, कोषागार अधिकारी पंकज मुधोळकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था अल्लापल्लीचे प्राचार्य सुरेंद्र भांडारकर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था एटापल्लीचे प्राचार्य मनीष वाळके, राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयचे प्राचार्य डॉ मारोती टिपले, चाणक्य अकॅडमी अल्लापल्ली चे संचालक जुगल बोमावार उपस्थित होते.

 

पुढे बोलताना नव्या पिढीला परंपरागत शिक्षणाबरोबर काळाची पावले ओळखून नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे गरजेचे आहे. देशाचे भवितव्य युवा पिढीच्या हातात आहे.त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे उद्योजक बनावे असे आवाहन आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्याधिकारी एन सी दाते यांनी व्यक्तिमत्त्वानुसार आपले करिअर कसे निवडावे याबाबत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. नुकतेच बारावीचा निकाल लागला,दहाव्या वर्गाचा निकाल लागणार आहे. मात्र त्यानंतर काय करायचं असा प्रश्न नक्कीच विद्यार्थ्यांच्या मनात असेल, आपल्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून कुठल्या क्षेत्रात जायचं याबाबत योग्य मार्गदर्शन घेऊन आपला क्षेत्र निवडा.त्यासाठीच या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरेंद्र भांडारकर यांनी केले.सूत्र संचालन भाग्यश्री येरावार तर आभार महोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.