दोन वर्षापासून राजाराम मार्गावर एसटीचे दर्शन दुर्लभ रस्त्याचे काम होऊनही दिरंगाई : शालेय विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय

105

दोन वर्षापासून राजाराम मार्गावर एसटीचे दर्शन दुर्लभ

रस्त्याचे काम होऊनही दिरंगाई : शालेय विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय

सिरोचा कडे ये-जा करणारे संपूर्ण बस फेऱ्या राजाराम – कमलापूर या मार्गाने सुरु करा.

अहेरी :- तालुक्यातील राजाराम साठी राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी डेपोची बस मागील अनेक वर्षापासून सुरु होती परंतु राजाराम खांदला या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून गोल्लाकर्जी राजाराम – कमलापूर – रेपनपल्ली या मार्गावरील बसफेऱ्या बंद करण्यात आले. सदर मार्गांचे काम पूर्ण झाले परंतु त्यातच लाॅकडाऊन घोषित झाल्यापासून राज्य परिवहन महामंडळाचे राज्यात पूर्णतः बस फेऱ्या बंद करण्यात आले.
अनलाॅकडाऊननंतर राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील बस फेऱ्या सुरू केल्या आहे. तरी मात्र राजाराम खांदला – कमलापूर – रेपनपल्ली या मार्गाने बस फेऱ्या सुरू न केल्याने प्रवाशांना खाजगी किंवा स्वतःच्या दुचाकी-चारचाकी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. परंतु यात ज्यांच्याकडे वाहने नाहीत अशांना मिळेल त्या वाहनांच्या आधार घ्यावा लागतो. त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

विशेष म्हणजे राज्य शासनाने 23 नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले आणि 27 जानेवारी पासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले. त्यामुळे विद्यार्थी आता शाळा, महाविद्यालयात अहेरी व आलापल्ली यायला लागली परंतु राजाराम – कमलापूर या मार्गाने मानव मिशनची स्कूल बस सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास अनंत अडचणींच्या समोर जावे लागत आहे.

राजाराम परिसरातील नागरिकांना दररोज विविध कामांसाठी अहेरी तालुका मुख्यालयात जावे लागते. नागरिकांना काम आटोपून परत गावी येण्यास नागरिकांना खाजगी वाहनांनी प्रवास करावी लागत आहे. मात्र अनेक खाजगी प्रवासी वाहनधारक मनमानीपणे प्रवासभाडे आकारतात.

6 कि.मी. पायपीट करून गोलाकर्जी जाऊन करावा लागतो पुढचा प्रवास

राजाराम मार्गावरील बस फेऱ्या बंद असल्यामुळे प्रवाशांच्या गैरसोय होत आहे. तालुका मुख्यालय व जिल्हा मुख्यालयात अथवा इतर ठिकाणी जाण्यासाठी 6 कि.मी. पायपीट व खाजगी वाहनाने गोलाकर्जी जावे लागते. त्यानंतर पुढचा प्रवास नागरिकांना करावी लागत आहे.

अहेरी आगारातील सिरोचा कडे ये-जा करणारे संपूर्ण बस फेऱ्या राजाराम – कमलापूर या मार्गाने सुरु करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व विद्यार्थी केली आहे.