नवीन ‘कृषीपंप वीज जोडणी धोरण’ शेतकरी हिताचे – अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे
Ø सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रकम भरल्यास वीज बील कोरे
Ø कृषीपंप ग्राहकांकडून जमा रकमेच्या 66 टक्के रकम पायाभुत सुविधा सुधारणेसाठी
Ø 5 वर्षापुर्वीच्या थकबाकीवर संपुर्ण व्याज व विलंब आकार माफ
चंद्रपूर, दि. 3 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर रहावे म्हणून राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने कृषीपंप वीज ग्राहकाला त्याच्या मागणीनुसार वीज जोडणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण-2020 जाहीर केले आहे. या धोरणानुसार कृषीपंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात येत असून सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रकम भरल्यास उर्वरित रकम माफ करण्यात येणार आहे. हे धोरण बळीराजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्युत वितरण विभागाच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी केले आहे.
या धोरणातील ठळक वैशिष्ट्यानुसार 30 मीटरच्या आत सर्व कृषी पंप ग्राहकांना तात्काळ वीज कनेक्शन देण्यात येईल. ज्या कृषीपंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीपासुन 200 मीटर आत आहे अशा नवीन कृषीपंप ग्राहकांना एरियल बंच केबल द्वारे 3 महिण्यात नवीन वीज जोडणी देण्यात येईल. 200 ते 600 मीटर आत असलेल्या ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध असून विशिष्ट परिस्थितीत 600 मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या कृषी ग्राहकांना सौरऊर्जा अथवा उच्चदाबावर वितरण प्रणालीचा पर्याय उपलब्ध असेल.
मागासवर्गीय कृषीपंप ग्राहकांसाठी नवीन वीज जोडण्यांकरीता सवलत उपलब्ध आहे. तसेच नवीन कृषी वीज जोडणीकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजना सुरु झाल्यापासुन 5 वर्षापुर्वीच्या थकबाकीवर संपुर्ण व्याज व विलंब आकार माफ केला असून मागील 5 वर्षाच्या थकबाकीवर देखील संपुर्ण विलंब आकार माफ़ करून व्याजदरात सवलत देण्यात आली आहे. तसेच सुधारीत थकबाकीची रक्कम कृषीपंप ग्राहकांच्या सोयीनुसार 3 वर्षात भरण्याची मुभा देण्यात आली आहे. यात पहिल्या वर्षी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीज बील माफ करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी पुर्ण रकमेचा भरणा न झाल्यास दुसऱ्या व तीसऱ्या वर्षी देखील वीज बीलात अनुक्रमे 30 टक्के व 20 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
कृषीपंप ग्राहकांकडून वसुल झालेल्या थकबाकीच्या 33 टक्के रकमेचा वापर संबंधीत ग्रामपंचायत क्षेत्रात व 33 टक्के रकमेचा वापर जिल्ह्याचे पालकमंत्री व महावितरणच्या अधिक्षक अभियंता यांच्या मंजुरीने जिल्ह्यातील कृषीपंप ग्राहकांकरिता पायाभुत सुविधा अद्यावत करण्यासाठी वापरल्या जाईल.
ग्रामपंचायत स्तरावर नवीन कृषीपंप वीज जोडणी, वितरण रोहित्रांची क्षमता वाढ, नवीन वितरण रोहित्र बसविणे, लघुदाब वाहिनीचे व 11 के. व्ही./22 के.व्ही. वाहिनीचे बळकटीकरणाची कामे करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर उपकेंद्रामध्ये स्टेशन टाईप व कॅपॅसीटर बसवणे तसेच खराब झालेले कॅपॅसीटर बदलणे, उपकेंद्रामधील अर्थिग बसविणे, उच्चदाब लिंक लाईन उभारणे इ. कामे व उपकेंद्रामधील देखभाल व दुरुस्तीचे कामे करणे करण्यात येणार असल्याचे अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे यांनी कळविले आहे.
0 0 0