सिंदेवाहीला लवकरच कृषी वन महाविद्यालय व कृषी अभियांत्रिकी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
Ø महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र ब्रह्मपुरी विभागात तयार होणार
Ø पुढील चार वर्षात पंजाबराव कृषी विद्यापीठाचे बळकटीकरण करणार
Ø मार्चपुर्वी वनविद्या महाविद्यालयाच्या मान्यतेचा प्रस्तावास मान्यता
चंद्रपूर दि. 6 फेब्रुवारी :- सिंदेवाही येथील वनविद्या महाविद्यालयाच्या मान्यतेचा प्रस्ताव येत्या मार्चपुर्वी मान्य करण्यात येईल तसेच पुढील दोन वर्षात ॲग्रीकल्चर इंजिनियरीग महाविद्यालय देखील सुरू करण्यात येईल असे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
सिंदेवाई येथे विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन समारंभ पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आज पार पडला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य गणेश कंडारकर, स्नेहा हरडे, विनायक सरनाईक, मोरेश्वर वानखेडे, डॉ. व्ही के खर्चे, सरेंद्र काळबांडे, रजणी लोणारे, आशा गंडाटे, मंदा बाळबुद्धे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अनिल कोल्हे प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या विकासासाठी येत्या चार वर्षात डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येवून विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलविण्यात येईल. सिंदेवाही येथील कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रासाठी 15 कोटी रुपये खर्चून नवीन प्रशासकीय इमारत उभी होणार आहे. यापुर्वीची इमारत 1911 ची होती 109 वर्षानी नवीन इमारत बांधण्यात येत आहे, येथून विकासाचे नवीन पर्व सुरू होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या केंद्राला उपसा सिंचन प्रकल्पासाठीदेखील निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्राद्वारे शेती करून आपला वेळ व श्रम वाचवावे, त्यातूनच शेतीवरील लागत व मनुष्यबळावरील खर्च कमी होऊन आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, हे सांगताना पालकमंत्री यांनी अमेरिकेत दोनशे एकर शेती चार लोक आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करतात याचे उदाहरण दिले.
गोसेखुर्द सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून निर्माण होणाऱ्या सिंचनाचा सर्वाधिक फायदा ब्रह्मपुरी विभागात होणार असून ब्रम्हपुरी विभाग महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षमता असलेला विभाग म्हणून नावारूपास येईल असेही प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
तत्पुर्वी कुलगुरू डॉ. भाले यांनी विद्यापीठाने विकसीत केलेल्या धान पिकांच्या वाणांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. सोनाली लोखंडे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. मदन वांढरे यांनी केले.
कार्यक्रमाला विद्यापीठाचे शास्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.