पाथरी-पालांदूर रस्त्यावरील पुल व रस्त्याचे बांधकाम थंडबस्त्यात

97

पाथरी-पालांदूर रस्त्यावरील पुल व रस्त्याचे बांधकाम थंडबस्त्यात

बांधकाम पूर्णत्वासाठी पाथरी वासियांची विनवणी

भंडारा: लाखनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या
पालांदूर(चौ)जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या मुख्य गावांमध्ये पाथरी हे गाव एक कृषीनिष्ठ गाव म्हणून ख्याती प्राप्त आहे.
पाथरीकडून पालांदूरला जोडला जाणारा रस्ता व या रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील पुलाचे अर्धवट बांधकाम कधी पूर्ण होणार असा सवाल पाथरीवासीय नागरिकांनी शासन व प्रशासनाला विचारला आहे.

पाथरी हे गाव चुलबंद नदी तीरावर वसलेले असून या गावाला नैसर्गिकरित्या वैभवसंपन्नता लाभलेली आहे.येथील शेतकरी बाराही महिने शेती करतात.पाथरी या गावाचा दररोजचा संपर्क पालांदूर या गावाशी येत असून,पाथरीवरून पालांदूरला येणारा रस्ता हा खुपच उखडला असून या रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे.
जागोजागी खड्डे पडले असून पायी चालणे सुध्दा जिकरीचे झाले आहे.
याच रस्त्यावर असलेल्या नाल्यावर अर्धवट बांधलेला पुल सुद्धा आहे. त्याचे बांधकाम का ठप्प पडले?ह्या प्रश्नाचे उत्तर लोकप्रतिनिधिंसह शासन व प्रशासनाकडे नाही.
तो पुर्णत्वास जाणार की नाही हा यक्षप्रश्न पाथरीवासीयांना सतावत आहे.
पाथरीवासियांना शासकीय किंवा निमशासकीय कामानिमित्त तसेच बँकांच्या व्यवहाराकरिता व इतरही कामकाजाकरीता पालांदूरला नेहमीच येणे जाणे करावेच लागते.
रस्ता खराब व पुलाच्या अर्धवट बांधकामामुळे नागरिकांना दोन तीन किलोमीटर जास्तीचे अंतर कापत पाथरी-लोहारा-खराशी-पालांदूर या मार्गाने जादा चे अंतर कापत पालांदूरला यावे लागते.परंतु वस्तुस्थिती अशी आहे की पाथरी ते खराशी हा रस्ता सुद्धा खूपच खराब झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनेच काय तर साधे पायी चालणे सुध्दा अवघड झाले आहे.अशा बिकट प्रसंगी पाथरी ग्रामवासी या अवघड वाहतुकीच्या समस्येने चिंतातुर व चिंताग्रस्त झाले आहेत व जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहेत. पाथरीवासियांनी संबंधित कामासंदर्भात लोकप्रतिनिधी,शासन व प्रशासनाकडे कित्येकदा निवेदने देऊन रस्ता दुरुस्ती व अर्धवट पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यासंदर्भात मागणी केली असल्याचे समजते .
रकाना
लोकप्रतिनिधींचा मतांवर डोळा व कामांवर कानाडोळा
पाथरीवासीयांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले की कोणताही जनप्रतिनिधी वा प्रशासन गावच्या समस्येकडे लक्ष देत नाही. लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीत मतांचा फार्स पुढे करुन मत मागण्यासाठीच गावात भेट देतात. गावच्या समस्या कुणाकडे मांडाव्या?, हा यक्ष प्रश्न ग्रामस्थांना पडला असून लोकप्रतिनिधींचा फक्त आमच्या मतांवर डोळा असतो तर गावसमस्यांकडे कानाडोळा करतात अशी विवंचना ग्रामस्थांनी बोलून दाखविली.