गडचिरोलीतील 286 गावे पेसा क्षेत्रातून बाहेर ..! ओबीसींना न्याय मिळणार… * आमदार डॉ. होळी यांची माहिती
वृत्तवानी न्यूज गडचिरोली :- गेल्या अनेक वर्षापासून ओबीसींवर अन्याय करणारा पेसा (अनुसूचित ) क्षेत्रातील गावांचा घोळ आता संपुष्टात आला असून नव्या सर्वेक्षणानुसार पेसा क्षेत्रातून 286 गावे बाहेर आली आहेत. त्यामुळे आता या गावांमधील ओबीसी वरील अन्याय दूर होणार आहे. तसेच ज्या गावात आदिवासींची लोकसंख्या अधिक आहे अशा 21 गावांना नव्याने पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आदिवासी व गैरआदिवासींवरील अन्याय दूर होणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी आज बुधवारी आयोजीत पत्रकार परिषदेतून दिली.
आमदार डॉ. होळी यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट राज्य अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेची 51 वी बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये गडचिरोली जिल्हयात अनुसूचित क्षेत्रातील पुर्नेरचनेचा प्रस्तावावर चर्चा झाली. पेसा आणि नॉनपेसा क्षेत्रातील गावांचा घोळ दूर करून त्या समाज घटकांवर होणारा अन्याय दूर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
सन 2011 च्या जनगणनेनुसार प्रशासनाच्या वतीने गडचिरोली जिल्हयातील पेसा व नॉनपेसा गावांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. गडचिरोली जिल्हयात 1681 गावे आहेत. यापैकी पुर्वी 1407 गावे पेसा क्षेत्रात समाविष्ट होती.
आता नव्या सर्व्हेक्षणानुसार 286 गावे पेसा क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत. तर नव्याने 21 गावांचा समावेश पेसा क्षेत्रात करण्यात आला आहे. आत नव्या सर्वेक्षनानुसार 1142 गावे पेसा क्षेत्रात कायम राहतील. पेसा क्षेत्रातील नव्या पुर्नेरचनेमुुळे आदिवासी आणि गैरआदिवासींवरील अन्याय दूर होणार आहे असे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे आभार मानले.
पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जेष्ठ नेते प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, भाजपा महिला आघाडीच्या गिताताई हिंगे, माजी पं.स.सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, भाजपाचे उपाध्यक्ष प्रणय खुणे, हेमंत बोरकुटे, मधूकर भांडेकर उपस्थित होते.
सात तालुक्यातील 100 टक्के गावे पेसात……!
गडचिरोली जिल्हयात 12 तालुके असून यापैकी कोरची, कुरखेडा, धानोरा, अहेरी, भामरागड, एटापल्ली आणि सिरोंचा या सात तालुक्यातील पुर्ण गावे पेसा क्षेत्रात असतील. जी 286 गावे पेसा क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत ती गैरआदिवासी बहुल असून वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी मुलचेरा या पाच तालुक्यातील आहेत. ज्या गावांमध्ये 50 टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या गैरआदिवासींची आहेत, अशी गावे पेसा क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत.
30 ऑक्टोबर पर्यंत आक्षेप, हरकती नोंदविता येणार…..!
पेसा क्षेत्रातील गावांची नव्याने पुर्नरचना करण्यात आली असून ज्यांना काही आक्षेप हरकती असतील त्यांनी 30 ऑक्टोबर पर्यंत प्रशासनाकडे नोंदवावी. तसेच 28 व 29 ऑक्टोबर रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर येणार असून मंत्री महोदयांना भेटून आपल्या आक्षेप, हरकती नोंदविता येतील अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेतून दिली.