*रेती तस्करी मस्त; महसूल-वनविभाग निद्रीस्त*
**प्रभा-याच्या कारभारामुळे तालुक्यात वाळू तस्करी जोमात*
एटापल्ली (ता. प्र.)
जिल्ह्यातील अतिदुर्गम, संवेदनशील भाग असलेल्या एटापल्ली तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून रेती तस्कर जोमात सुरु आहे. रात्रीच्या किर्रर्र अंधाराचा फायदा घेत रेती तस्करी सुरु असतांना महसूल विभाग, वनविभागाद्वारे कारवाई शुन्य आहे. तालुक्यातील अनेक विभागाचा कारभार प्रभारींवर सुरु असल्याने रेती तस्कराचे चांगलेच फावत आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरु असतांना संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी निद्रावस्थेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुकास्थळ असलेलया एटापल्लीत रेती बांडे नदीच्या पात्रातुन येत सदर घाट मागील काही वर्षापासून बंद आहे. सदर क्षेत्र वनविभागाच्या अधिन येत असल्यामुळे सदर घाट बंद करण्यात आले. असे असतांनाही मागील काही दिवसांपासून या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची उत्खनन करुन सर्रास वाहतूक सुरु आहे. रेती तस्कर रात्रीच्या किर्रर्र अंधाराचा फायदा घेत या नदी पात्रातून रेती उत्खनन करुन वाहतूक करीत आहे. यामुळे शासनाला कोट्यवधीचा चुना लागत अआहे. वनविभागाचे आणि रेती तस्करांचे लागेबंधे असल्यानेच रेती वाहतूकीचा अवैध धंदा जोमाने सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे.
वनविभाग तसेच महसूल विभागाद्वारे रेती वाहतूक प्रकरणी थातूरमातूर कारवाया केल्या जात असल्याने रेती तस्कर चांगलेच निर्ढावलेले आहेत. सदर नदीपात्रातून आतापर्यंत हजारो ब्रास रेतीची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करण्यात येत आहे. तालुकास्थळ असलेल्या एटापल्ली शहरातील प्रत्येक वार्डात रेतीचे ढग रस्त्याच्या कडेला पडून दिसत असतांना याचा जाब कुणीच विचारत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महसूल विभाग, वनविभागासह पोलिस विभागाचे कॅमरे मुख्य रस्त्यावर नजर ठेऊन असतांना अवैध रेती वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई होत असल्याने शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडत आहे. त्यामुळे वनविभाग, महसूल विभागाने याकडे जातीने लक्ष देत रेती तस्करांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.