सुरजागडच्या ठाकुरदेव यात्रेकरीता बसेस सोडा  शेतकरी कामगार पक्षाची मागणी

32

 

सुरजागडच्या ठाकुरदेव यात्रेकरीता बसेस सोडा

 

शेतकरी कामगार पक्षाची मागणी

 

गडचिरोली : एट्टापल्ली तालुक्यातील सुरजागड येथील ठाकुरदेव यात्रेकरीता गडचिरोली आगारातून सुरजागड करीता यात्रा विशेष बसेस सोडण्यात याव्यात अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

 

गडचिरोलीच्या आगार

प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील माडीया आदिवासी जमातीचे दैवत असलेल्या ठाकूरदेवाची यात्रा पुर्वापारपणे दरवर्षी ५,६ आणि ७ जानेवारी रोजी भरत असते. या यात्रेला गडचिरोली जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगाणा या राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावत असतात. गडचिरोली जिल्हा मुख्यालय ठिकाणाहुनही मोठ्या संख्येने भाविक ठाकुरदेव यात्रेला हजेरी लावतात. मात्र गडचिरोली ते सुरजागड अशी प्रवासाची सक्षम व्यवस्था नसल्याने भाविकांची गैरसोय होते.

 

त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय आणि सुरजागडच्या ठाकुरदेव यात्रेचे महत्व लक्षात घेवून गडचिरोली आगारातून सुरजागड यात्रेकरीता दिनांक ५,६ आणि ७ जानेवारी रोजी विशेष बसेस सकाळी ७.०० वाजता पासून साडण्यात याव्यात, अशी मागणी भाई रामदास जराते यांनी केली आहे.

 

विशेष म्हणजे दरवर्षी होणाऱ्या ठाकुरदेव यात्रेदरम्यान ढोल – मांजऱ्यासह पारंपारिक रेला नृत्य आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन ठाकुरदेव यात्रेदरम्यान होत असते. तसेच अधिकार संम्मेलन आणि पारंपारिक प्रमुखांच्या बैठकीत विविध प्रश्नांवर सामुहिक चर्चा करून ठरावही केले जातात. खदान विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलिकडच्या काळात सुरजागडच्या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.