भविष्यवेधी शिक्षणाचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षकांनी सतत अद्यावत होत सज्ज राहिले पाहिजे. प्रसिद्ध व्याख्याते शिक्षणतज्ञ सूर्यकांत डोळसे यांचे  प्रतिपादन

90

भविष्यवेधी शिक्षणाचे आव्हान पेलण्यासाठी शिक्षकांनी सतत अद्यावत होत सज्ज राहिले पाहिजे.

 

प्रसिद्ध व्याख्याते शिक्षणतज्ञ सूर्यकांत डोळसे यांचे

प्रतिपादन.

 

पाटोदा (प्रतिनिधी)

*राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचे स्वप्न आहे. यामध्ये शाळा आणि शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांचे भविष्य निर्माण होणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होत असलेले क्रांतिकारी बदल आणि होत असलेल्या नवनवीन संशोधनाचा विचार केला असता त्याला सामोरे जाणारे शिक्षक तयार असणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षकाने दररोज आपले ज्ञान कौशल्य तंत्रज्ञान अद्यावत केले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते शिक्षणतज्ञ सूर्यकांत डोळसे यांनी केले.*

शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अध्ययन व्यवस्थेचे व्यवस्थापन या प्रशिक्षण वर्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या समारोपप्रसंगी बोलत होते.

पद्मभूषण वसंत दादा पाटील महाविद्यालय पाटोदा येथे पाटोदा तालुक्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. सदरील प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा यशस्वीरित्या पार पार पडला त्यावेळी सूर्यकांत डोळसे बोलत होते.

यावेळी बोलताना सूर्यकांत डोळसे पुढे म्हणाले की, नवनवीन आव्हाने आणि नवनवे ज्ञान प्रवाह तयार होत असताना त्यातील शिक्षक प्रशिक्षण ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांनी कधीकाळी घेतलेले प्रशिक्षण कालवाह्य होत असून नव्या नव्या संकल्पना आणि शैक्षणिक प्रवाह सोबत ते अपुरे ठरत आहे. त्यासाठी वेळोवेळी शिक्षकांना प्रशिक्षित करणे हे धोरण महत्त्वाचे आहे.

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यामुळेच महत्त्वाचे ठरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्य विकसित होण्यासाठी पारंपारिक शिक्षणाची अध्यापन कौशल्य अपुरी पडू शकतात. कारण पारंपारिक शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये वरून ज्ञान कोंबणे अशी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया पार पाडली गेली. मात्र विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या आत्मशक्तींना, जिज्ञासू वृत्तीला आणि कौशल्यांना पुरेसा वाव देण्याचा प्रयत्न पाहिजे होता. तडा प्रयत्न फार प्रमाणात झाल्याचे दिसून आलेले नाही. मात्र या प्रशिक्षणामुळे आपल्या विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती जागृत होईल. विद्यार्थी स्वतःहून शिकण्यास उत्सुक होतील. भविष्यातील आव्हाने पेलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होईल. विद्यार्थ्यांमध्ये विश्व नागरिकत्वाची भावना विकसित होईल.या सगळ्या बाबींसाठी सदरील प्रशिक्षण खूप मोलाचे आहे.

उशिरा का होईना पण आपण या नव्या अध्ययन प्रक्रियेकडे जात आहोत ही आनंददायी बाब आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आणि संपन्नता देण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. त्याचवेळी शिक्षकांना अध्यापन स्वातंत्र्य आणि व्यावसायिक संपन्नता आणि प्रतिष्ठा मिळत गेली पाहिजे ती वाढत गेली पाहिजे असाही आग्रह त्यांनी यावेळी धरला.

सदरील अध्ययन व्यवस्थापन प्रक्रियेचे पूर्व इतिहास उघडून दाखवताना त्यांनी १९२१मध्ये जगातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा काढणाऱ्या क्रांतिकारी अशा ए.एस.नीलचा उल्लेख केला. ‘समर हिल’ या शाळेची क्रांतिकारी वाटचाल उलडून दाखवताना निल चे विचार किती क्रांतिकारी आणि भविष्यवेधी होते हे स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी जे कृष्णमूर्ती यांच्या शिक्षण विषयक विचारांचा आणि आचार्य ओशो रजनीश यांच्या शैक्षणिक विचारांचा संदर्भ दिला.

आपला मान सन्मान दर्जा आणि प्रतिष्ठा जगण्यासाठी शिक्षकांनी सतत अपडेट राहिले पाहिजे. बदलत्या आणि आव्हानात्मक काळात इतर सहकारी शिक्षकांचा आणि आपला आपणच पाठीराखा बनले पाहिजे.

अशी आग्रही अपेक्षाही सूर्यकांत डोळसे यांनी शेवटी व्यक्त केली. याचवेळी श्रीमती मुंडे मॅडम यांनीही आपली प्रतिनिधी प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी विचार मंचावर गट समन्वयक रामचंद्र सुळे, प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शक मुसळे सर, सोंडगे सर, दगडखैर सर, शिंदे सर आणि गोपीनाथ मुंडे शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज गायकवाड यांनी केले.