आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
गडचिरोली : आगामी लोकसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात खांदेपालट करण्यात आली आहे. राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने ३० जानेवारीला जारी केले. यात नक्षलप्रभावित गडचिरोलीमधील १० अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्या जागी नवे अधिकारी येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्वजिल्ह्यात कार्यरत असलेल्या तसेच ३० जून २०२४ पर्यंत किंवा त्यापूर्वी चार वर्षांपैकी तीन वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या बदलीपात्र अधिकाऱ्यांची माहिती मागवली होती. यानुसार विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी १३० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले.
गडचिरोली पोलिस दलात कार्यरत पोलिस निरीक्षक संदीप पाटील, अमोल फडतारे यांची पिंपरी चिंचवड, प्रमोद बनबळे, अरविंदकुमार कतलाम यांची वर्धा, कपिल गेडाम राज्य गुप्त वार्ता विभाग, कुमारसिंग राठोड छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण), कुंदन गावडे सोलापूर शहर, संदीप मंडलिक नाशिक, श्याम गव्हाणे चंद्रपूर तसेच वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे.
रिक्त झालेल्या १० अधिकाऱ्यांच्या जागी नवे १० अधिकारी येणार आहेत. नागपूर शहर येथील अनिरुद्ध पुरी, विशाल काळे, रवींद्र नाईकवाड, विनोद रहांगडळे, विश्वास पुल्लारवार, छत्रपती संभाजीनगर शहर येथील चंद्रकांत सलगरकर, सोलापूर शहरचे विनोद वाबळे, अजय जगताप, पिंपरी चिंचवड येथील दशरथ वाघमोडे, ठाणे शहरचे अतुल लंबे यांना गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे