शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

88

शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

गडचिरोली,(जिमाका)दि.18:-  छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जिल्हयात मोठया प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली दीपक सिंगला यांनी शासन निर्देशान्वये कोविड -19 साथरोग अंतर्गत जिल्हा सीमा क्षेत्रामध्ये कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, या वर्षी दिनांक 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. शिवजयंती साजरी सर्वच ठिकाणी एकत्र येऊन केली जाते परंतु यावर्षी कोविड -19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठया प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सवा साजरा करणे अपेक्षित आहे असे जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे. दरवर्षी शिवजयंती साजरी करतांना संपूर्ण जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु या वर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक, इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये . त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी असे त्यामध्ये सूचना करण्यात आल्या आहेत.
तसेच कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईकर रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन फक्त 10 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सीग तसेच स्वच्छतेचे नियम ( मॉस्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. कोविड-19 च्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुर्नवसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबधित नगरपालीका /नगर पंचायत , पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे कोटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे लागणार आहे.
सदर परिपत्रकाचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , गडचिरोली यांनी कळविले आहे.
**