कोवीड लस सुरक्षित व परिणामकारक
रोग प्रतिकार शक्ती निर्माण होण्यास लागतात 42 दिवस
जनतेनी गैरसमज, अफवांपासून सावध असाव
चंद्रपूर, दि. 18 फेब्रुवारी : कोवीडलस घेतल्यानंतरही वैद्यकिय अधिकारी कोविड पॉझिटिव्ह अशी बातमी सध्या वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी खुलासा सादर केला आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र ,चंदनखेडा येथील वैद्यकिय अधिकारी यांनी कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी कोविड लसीचा पहिला डोज घेतला. त्यांना दिनांक 13 फेब्रु 2021 पासुन डोकेदुखी, ताप इ. लक्षणे आढळल्याने त्यांनी दिनांक 15/2/2021 ला कोरोना तपासणी (RTPCR) केली असता ते कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
परंतु ही घटना सर्वसामान्य आहे. शासनाद्वारे उपलब्ध करण्यात आलेली कोविड लस ही सुरक्षित व परिणामकारक आहे. मात्र कोरोना विरुध्द प्रतिकार शक्ती निर्माण होण्यास कोविड लसीचा पहिला डोज व त्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोज घेतल्यानंतर दोन आठवडयांनी कोविड विरुध्द प्रतिकार शक्ती निर्माण होते. या प्रक्रिये दरम्यान संबधित व्यक्तीने काळजी न घेतल्यास व कोरोना रुग्णाचे संपर्कात आल्यास त्यास संसर्ग होवून तो पॉझिटिव्ह येवू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर इत्यादी संपूर्ण दक्षता घेणे अत्यावश्यक आहे , असे जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी कळविले आहे.