कोविड नियमांचे पालन करा – डेरा आंदोलनातील कामगारांचे नागरिकांना आवाहन

101

कोविड नियमांचे पालन करा – डेरा आंदोलनातील कामगारांचे नागरिकांना आवाहन

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढत आहे.या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागरिकांना ‘मी जबाबदार’ संदेशाचे पालन करण्याचे आवाहन केलेले आहे.मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत डेरा आंदोलनातील कामगारांनी आज पूर्ण चेहरा झाकलेले मास्क घालून धरणे दिले. तसेच हातामध्ये ‘मास्क वापरा’ , ‘अंतर ठेवा’ व ‘वारंवार हात धुवा किंवा सॅनेटाईज करा,’ अशा प्रकारचे संदेश लिहिलेले फलक घेऊन दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत डेरा आंदोलनातील मंडपामध्ये धरणे दिले.
वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कोविड योद्ध्यांना सात महिन्यांचा थकीत पगार व किमान वेतन देण्यात यावे या मागण्यासाठी सुरू असलेल्या डेरा आंदोलनाचा आज १६ वा दिवस आहे. अजूनपर्यंत कामगारांच्या मागण्यांवर तोडगा निघालेला नसल्यामुळे आंदोलनकर्त्या कामगारांनी कोरोनाचे संक्रमणापासून बचाव करण्याच्या हेतूने डेरा आंदोलनाच्या नियोजनामध्ये बदल केलेला आहे.दिनांक २४ फेब्रुवारी पासून कामगारांची तीन भागांमध्ये विभागणी करून आळीपाळीने डेरा आंदोलनात कामगार सहभागी होणार आहेत.सकाळी ८ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री ८ व रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत अशा तीन पाळीमध्ये कामगार आंदोलनात उपस्थित राहतील.अंतर नियमांचे पालन करून तसेच मास्क घालून आंदोलनकर्ते कामगार कोरोना बाबत पूर्ण काळजी घेतील. मात्र जोपर्यंत थकीत पगार व किमान वेतन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,अशी भूमिका कामगार कामगारांनी घेतली असल्याचे जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.