*कंकडालवार यांच्या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करावा*   *सरकार आंदोलनाची दखल घेत नाही*

34

*कंकडालवार यांच्या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करावा*

 

*सरकार आंदोलनाची दखल घेत नाही*

 

*जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी तात्काळ भेट द्यावी*

 

*विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार*

 

मुंबई,दि.4:- जिल्हा परिषद गडचिरोलीचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार, हे पाच दिवसांपासून पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली समोर उपोषणाला बसले आहेत. अजूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही. शासनाचा कोणताही प्रतिनिधी तेथे गेला नाही. जिल्हाधिकारी यांना तात्काळ तेथे भेट द्यायला सांगून श्री.कंकडालवार यांच्या सर्व मागण्यांबाबत ठोस कार्यवाही करावी. त्यांनी मांडलेल्या संपूर्ण प्रकरणाची महिनाभरात चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली आहे.

 

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे हा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी ते बोलत होते.

 

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायत हद्दीमध्ये नियमबाह्य बांधकामं आणि ले आऊट तयार केले आहेत. शासनाच्या परवानगीशिवाय लेआऊटची विक्री झाली. यामध्ये जवळपास ऐंशी कोटी भूखंडाची विल्हेवाट लावली आहे. अहेरी नगरपंचायत हद्दीतील नियमबाह्य लेआउट मध्ये केलेल्या कामाचा निधी, लेआउट धारकांकडून वसुली करण्यात यावी. मौजा – अहेरी येथील सर्वे क्रमांक २७० च्या जमिनीच्या मालकी हक्कदारांच्या मयतीनंतर खोटे समंतो दाखवून पोट हिस्सा केलेल्या प्रकरणाची व मृत व्यक्तीला परत जिवंत दाखवून एनएपी – ३४ करिता मागणी केलेल्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अहिरे नगरपंचायत हद्दीतील उपविभागीय अधिकारी दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून लेआउट धारकांनी केलेल्या अनधिकृत प्लॉट खरेदी केलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून आदेश रद्द करण्यात यावे, प्रॉपर्टी कार्ड क्रमांक 1409 सीट क्रमांक 09 चे कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्यात यावी, लेआउट मध्ये केलेल्या कामांची शासकीय निधी लेआउट धारकांकडून वसुली करण्यात यावी ही अजय कंकडालवार यांची प्रमुख मागणी आहे असे श्री. वडेट्टीवार म्हणाले.

 

श्री. वडेट्टीवार पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायत हद्दीमध्ये नियमबाह्य बांधकामाबाबत तसेच अहेरी चेरपल्ली येथील डांबरीकरणाच्या नियमबाह्य कामाबाबत शासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात येत नसल्यामुळे, श्री.प्रशांत गोडशेलवार (नगरसेवक) अहेरी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मार्च, २०२३ ला उपोषणाला बसले होते, मात्र नायब तहसिलदार यांनी, श्री.गोडशेलवार यांच्या मागण्यांबाबत चौकशी समिती स्थापन करण्यात येऊन प्रत्येक मुद्यांची चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले होते.

 

परंतु आज एक वर्ष उलटूनही शासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे अजय कंकडालवार हे मंगळवार, दिनांक ०२ जुलै, २०२४ रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली समोर उपोषणाला बसले आहेत. शासनाने तात्काळ जिल्हाधिकारी यांना उपोषणस्थळी भेट द्यायला सांगून श्री.कंकडालवार यांच्या सर्व मागण्यांबाबत ठोस कारवाई करावी. या प्रकरणाची महिनाभरात चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.