*भेसळयुक्त अन्न नमुन्यांच्या तपासणीसाठी* *‘पीपीपी’ पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती*

25

*भेसळयुक्त अन्न नमुन्यांच्या तपासणीसाठी*

 

*‘पीपीपी’ पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती*

 

– अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

 

मुंबई, दि. १० : भेसळयुक्त अन्न नमुने तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र, प्रयोगशाळांची अन्न नमुने तपासण्याची मर्यादीत क्षमता असल्याने मोठ्या प्रमाणावर अन्न नमुने तपासणीसाठी प्रतीक्षेत असतात. अशा परिस्थितीत ‘पीपीपी’ (पब्ल‍िक प्रायव्हेट पार्टनरशीप) पद्धतीवर प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 

सदस्य मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य अनिल देशमुख, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, योगेश सागर यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

 

मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात अंमली पदार्थ व अल्पार्झोलाम (कुत्ता गोळी) यांची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मार्च ते मे 2024 दरम्यान 6 गुन्हे दाखल करून 13 आरोपींना अटक केली आहे. मालेगाव शहर परिसरात टिक्का फ्राय मसाला, मिरची पावडर, सिंथेटिक पावडर यासह एक लाख 90 हजार रुपये किमतीचे एकूण 610.5 किलोग्रॅम साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

भेसळयुक्त दुधाबाबत एका वर्षात 196 दुधाचे नमुने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 25 हजार 338 लिटर दुधाचा साठा जप्त करण्यात आला असून 13 लाख 44 हजार 406 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुधाची भेसळ रोखण्यासाठी 20 अधिकाऱ्यांचे विशेष पथकही तयार करण्यात आले आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचे अन्न सुरक्षा अधिकारी यांना दरमहा उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाया वाढल्या आहेत, असेही मंत्री श्री. आत्राम यांनी सांगितले.

 

0000