*मिरची पिक-उत्तम कृषि पद्धतीवर कार्यशाळा संपन्न*

15

*मिरची पिक-उत्तम कृषि पद्धतीवर कार्यशाळा संपन्न*

गडचिरोली दि. 10 : सहकार व पणन विभाग अंतर्गत आशिया विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान उमेद गडचिरोली व कृषी विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने काल गडचिरोली येथे एक दिवसीय मिरची उत्तम कृषी पद्धती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मा.श्री राजेंद्र भुयार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,गडचिरोली, श्री. प्रदीप तुमसरे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली मा.श्री प्रशांत शिर्के, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ,गडचिरोली मा. श्री रुपेश माने, कृषी व्यवसाय तज्ञ, मॅग्नेट प्रकल्प,नागपूर, मा.श्री बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली, मा. श्री हेमंत जगताप,मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल,शिवाजीनगर, पुणे मा. डॉ. संदीप कराळे, प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर,गडचिरोली, मा. श्री सुमित कांबळे, कन्सल्टंट मॅग्नेट प्रकल्प, मा.श्री ओम प्रकाश सुखदेवे, GESI, अधिकारी,मॅग्नेट प्रकल्प नागपूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी श्री राजेंद्र भुयार यांनी सर्वप्रथम जास्तीत जास्त गडचिरोली जिल्ह्यातील महिलांनी सदर कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदवल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये भाजीपाला लागवडीचे क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर जास्त असून, त्यामध्ये मिरची हे प्रमुख पीक आहे त्याची शास्त्रीय पद्धतीने लागवड करून अधिक उत्पादन मिळवता येते यासाठी सदर कार्यशाळा अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. श्री प्रशांत शिर्के यांनी महिलांनी एकत्रित येऊन बचत गटाच्या मार्फत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच मिरची पिकाची रोपवाटिका तयार करून गटामार्फत त्याची विक्री केल्यास गटाला त्याचा आर्थिक फायदा होऊ शकतो व शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे रोपे उपलब्ध होऊ शकतात असे त्यांनी सांगितले. श्री मास्तोळी सर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. श्री हेमंत जगताप यांनी प्रास्ताविकामध्ये मॅग्नेट प्रकल्पामध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या या आर्थिक वर्षाची सुरुवात गडचिरोली पासून केली असल्याचे सांगितले. अजूनही अशा प्रकारच्या जास्तीत जास्त कार्यशाळा गडचिरोली जिल्ह्यासाठी राबविण्यात येतील असे त्यांनी सांगितले. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत मिरची पिकाबरोबरच इतरही भाजीपाला व फळपिके याविषयी भविष्यामध्ये गडचिरोलीमध्ये जास्तीत जास्त कार्यक्रम मावीमच्या मदतीने घेण्यात येतील असे सांगितले. डॉ. कराळे यांनी कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथील सोयी सुविधांचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. श्री रुपेश माने कृषी व्यवसाय तज्ञ मॅग्नेट प्रकल्प नागपूर यांनी मॅग्नेट प्रकल्पाची सविस्तर माहिती महिलांना प्रयत्न करून दिले.

सदर कार्यशाळेमध्ये डॉ.सुचित लाकडे, डॉ.संदीप कराळे, श्री सतीश गिरसावळे व श्री ओम प्रकाश सुखदेवे यांनी महिलांना लैंगिक समानता व सामाजिक समावेश याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ३०० पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री हेमंत जगताप मनुष्यबळ विकास व वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ,साखर संकुल, शिवाजीनगर,पुणे यांनी केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मामी गडचिरोली व एम सी डी सी पुणे येथील अधिकारी वर्गाचे सहाय्य लाभले.