इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घ्यावा

22

इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घ्यावा

 

गडचिरोली,दि.11(जिमाका):इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात अर्ज करुन देखील शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरचे व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेता यावे या करिता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” अंतर्गत अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी आवश्यक ती रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमाकरणे करिता शासनाने दि.11 मार्च 2024 (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) च्या शासन निर्णयान्वये “ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेणे करिता विद्यार्थी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. तसेच सदर विद्यार्थी व्यावसायिक तसेच बिगरव्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या तालुकास्तर व जिल्हास्तरीय महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी च्या परिक्षेमध्ये 60 टक्के गुण असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रु.2.50 लाखपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या/तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली इतर मागासप्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. अनाथ प्रवर्गातुन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

या योजनेमध्ये दिव्यांग लाभार्थ्यास 4 टक्के आरक्षण किंवा शासनाने वेळोवेळी निर्धारीत करेल त्याप्रमाणे असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्तेची किमान टक्केवारी मर्यादा 50 टक्के इतकी राहील. दिव्यांग प्रवर्गातुन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सदर योजने अंतर्गत महिलांसाठी 30 टक्के समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्धारीत करेल त्याप्रमाणे आरक्षण अनुज्ञेय असेल.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी खालील प्रमाणे शासनाने दिलेल्या तक्त्यानुसार अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण गडचिरोली यांचेकडे अर्ज सादर करावा.

उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षाकरीता अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही, दि.15 जुलै 2024 आहे व निवड यादी जाहीर करण्याची तारीख ही 01 ऑगस्ट 2024 आहे. तर उच्च शिक्षणाचे प्रथम वर्षाकरीता अर्ज स्विकारण्याची तारीख ही 05 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटचा तारीख दि.20 ऑगस्ट 2024 निवड यादी जाहिर करण्याचा दिनांक 02 सप्टेंबर 2024 असा आहे.

सदर योजनेचा लाभ घेणेसाठी विहीत अर्जाचा नमुना सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण गडचिरोली या कार्यालयात अर्जाची प्रत व क्युआर स्कॅनर उपलब्ध आहे. असे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

0000