*लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका,विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोमाने काम करा: रमेश चेन्नीथला*

17

*लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका,विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोमाने काम करा: रमेश चेन्नीथला*

 

*नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घसरण तर राहुल गांधींच्या लोकप्रियेत मोठी वाढ.*

 

*महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची आढावा बैठक टिळक भवनमध्ये संपन्न.*

 

मुंबई, दि. १२ जुलै

काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर मागील काही दिवसात टीका होत होती परंतु लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलले आणि आज महाराष्ट्रात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष बनला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले यश मिळालेले आहे पण पुढील लढाई सोपी नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी मेहनत करावी लागणार आहे. लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आजपासूनच कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.

 

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची आढावा बैठक टिळक भवन मध्ये संपन्न, यावेळी ते बोलत होते, चेन्नीथला पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी युवक काँग्रेसचीही भूमिका महत्वाची आहे. काँग्रेसची परंपरा घेऊन वाटचाल करा, निवडणुकीत युवक काँग्रेसवर मोठी जबाबदारी असते, घरोघरी जाऊन प्रचार करणे, मतदाराला मतदान केंद्रावर आणणे यासह पक्षाची सर्व कामे युवक काँग्रेसला करायची आहेत. विधानसभा निवडणुकीला ९० दिवस बाकी आहेत या ९० दिवसात सरकार बदलण्यासाठी सर्व पातळीवर काम करण्याची गरज आहे. राज्यातील सहा विभागात बैठका घेऊन कार्यक्रमांची आखणी करा व प्रत्येक बुथपर्यंत पक्षाचा विचार पोहचवा. विभाग, जिल्हा, ब्लॉक, पंचायत किंवा बुथ लेवलवर बैठका घ्या. जनता महाविकास आघाडीबरोबर आहे, महाराष्ट्रात परिवर्तन व्हावे अशी जनतेची भावना आहे परंतु संघर्ष केल्याशिवाय विजय मिळणे सोपे नाही.

 

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशभरातून दोन पदयात्रा काढल्या, त्याचा लोकसभा निवडणुकीत चांगला परिणाम दिसून आला. राहुल गांधी जनतेचे दुःख जाणून घेतात आणि जनतेचाही त्यांच्यावर विश्वास वाढलेला आहे. आज देशभरात नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटत चालली आहे तर राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत दररोज वाढ होत आहे. विधानसभा निवडणुकीत तरुणांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे ते रास्त आहे, ज्यांच्यामध्ये विजयी होण्याची क्षमता आहे त्याला उमेदवारी देण्याचा विचार पक्ष करेल. काँग्रेस पक्षात नवीन चेहऱ्यांना नेहमीच संधी दिली जाते. महाराष्ट्र, झारखंड व हरियाणा या राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठा विजय मिळावा यासाठी काम करा. या तीन राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकला तर दिल्लीतील मोदींचे सिंहासन डळमळीत होईल, असा विश्वासही रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

 

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. बी. व्ही. श्रीनिवास, युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तिअंबिरे, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, सचिव श्रीकृष्ण सांगळे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.