*आलापल्ली-सिरोंचा मार्गावर नागरिकांचे हाल* *पर्यायी रस्त्याकडे संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष*

38

*आलापल्ली-सिरोंचा मार्गावर नागरिकांचे हाल*

 

*पर्यायी रस्त्याकडे संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष*

 

*वाहनधारकांना करावा लागत आहे अडचणींचा सामना*

 

आलापल्ली: ऐन पावसाळ्याच्या तोंडावर राष्ट्रीय महामार्गासह पुलाचे बांधकाम सुरू केल्याने आलापल्ली ते सिरोंचा या महामार्गावर नगरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुलाचे बांधकाम सुरू करताना संबंधित कंत्राटदाराला रहदारीसाठी पर्यायी रस्ता मजबूत करून देणे गरजेचे होते. मात्र तसे न करता केवळ माती टाकून दिल्याने ऐन पावसाळ्यात या मार्गावर धावणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेली काही दिवसापासून या पर्यायी रस्त्यावर चिखलाचा साम्राज्य निर्माण झाल्याने चारचाकी सह दुचाकी वाहने अडकून पडत आहेत. त्यामुळे अनेकदा वाहतूक ठप्प होताना दिसून येत आहे. कुठल्याही मुख्य रस्त्यावर काम करताना संबंधित कंत्राटदाराला पर्यायी रस्ता मजबूत करून वाहतूक सुरळीतपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी असते. मात्र या राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या कंत्राटदाराचे पर्यायी रस्त्याकडे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

 

तेलंगाणा आणि छत्तीसगड राज्यात जाण्यासाठी सर्वात महत्वाचं मानला जाणाऱ्या आलापल्ली ते सिरोंचा (३५३ सी) या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही दिवसांपासून रस्त्याचे व पुलाचे बांधकाम सुरू आहेत.या महामार्गाचे बांधकाम तीन कंत्राटदाराकडून केले जात आहे.

आलापल्ली ते गुड्डीगुडम,गुडडीगुडम ते रेपनपल्ली आणि रेपनपल्ली ते सिरोंचा असे तीन कंत्राटदारांना काम मिळाला आहे.त्यातील रेपनपल्ली ते सिरोंचा पर्यंत सिमेंट रस्त्याचे काम मागील एक वर्षांपासून सुरू आहे.तर इतर दोन ठिकाणी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरू करण्यात आले.त्यामुळे पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही आणि त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

 

आलापल्ली ते गुड्डीगुडम पर्यन्त जवळपास १६ किलोमीटर अंतरचा रस्ता आणि पुलांचे बांधकाम वशिष्टा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद या कंपनीला मिळाला आहे. तब्बल ५६ कोटी ९३ लाख,७७ हजार ६०० रुपयांच्या निधीतून हे काम पूर्ण केले जाणार आहे. या कामाकरिता संबंधित कंपनीला 2021 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. वनविभागाच्या नाहरकत प्रमाणपत्रामुळे थोडाफार उशीर झाला असला तरी संबंधित कंत्राटदाराने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या मार्गावर पुलाचे बांधकाम करण्याचे काम हाती घेतले आहे. विशेष म्हणजे अवघ्या एक ते दीड महिन्यात हे काम पूर्ण होणार नाही हे माहीत असताना देखील पावसाळ्यात विविध ठिकाणी खड्डे खोदून फुलांचे बांधकाम करताना पर्यायी मार्ग व्यवस्थित नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

 

आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर अहेरी आणि सिरोंचा तालुक्यातील शेकडो गावांचा समावेश आहे. या भागातील नागरिकांना गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्हा मुख्यालय किंवा चंद्रपूर जिल्ह्यात गेल्याशिवाय पर्याय नाही. एवढेच नव्हे तर या परिसरातील गरोदर मातांना अहेरी उपजिल्हा सामान्य रुग्णालय किंवा गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय गाठावे लागते. अशात अनेकदा तासंतास या मार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने रुग्णवाहिका देखील अडकून पडल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत गरोदर माता किंवा गंभीर रुग्णांचा जीवाला धोका झाल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सध्या पुलाचे बांधकाम संत गतीने सुरू आहेत तर दुसरीकडे संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी या कामाकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या महामार्गावरून अहेरी, आलापल्ली शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे, रुग्णांचे व गरोदर मातांचे मोठे हाल होताना दिसून येत आहे.

 

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन संबंधित कंत्राटदाराला पर्यायी रस्ता मजबूत करून देण्याचे सूचना द्यावे जेणेकरून या मार्गावर वाहतूक ठप्प होणार नाही आणि सर्वसामान्य जनतेचा प्रवास सुकर होईल अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

 

बॉक्स—-

*संपूर्ण प्लांट उभारणी न करताच कामाला सुरुवात ?*

सदर रस्त्यावर काम सुरू झाल्यापासूनच सर्वसामान्य नागरिकांकडून कामाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.मुरूम सब ग्रेडचे संपूर्ण लेयर व जीएसबी कामात देखील गैर प्रकार सुरू असल्याची ओरड सुरू आहे.करारनाम्यानुसार संपूर्ण प्लांट उभारणी करून कामाला सुरू करणे गरजेचे असताना अर्धवट प्लांट उभारणी करून कामाला सुरुवात केली आहे अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाला दर्जा कसा मिळणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

बॉक्स——

सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंतांना देखील तक्रार दिली आहे.मात्र, संबंधित विभागाकडून याकडे अक्षरशा दुर्लक्ष केली जात आहे.संपूर्ण प्लांट उभारणी न करताच संबंधित कंत्राटदाराने मोबिलायझेशनची रक्कम देखील उचल केली असावी अशी शंका आहे. यासह इतर कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी येत्या काही दिवसात अपर जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करणार आहे.

-संतोष ताटी कोंडावार, जिल्हाध्यक्ष जनकल्याण समाजोन्नती,अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती