*आदिवासी संस्कृती जोपासणे काळाची गरज* संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार *मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन*

55

*आदिवासी संस्कृती जोपासणे काळाची गरज*

संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार

*मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन*

 

*गडचिरोली:*- आदिवासी रूढी, परंपरा, संस्कृती जोपासणे व ओळख कायमस्वरूपी टिकवून ठेवणे काळाची गरज असल्याचे मत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केले.

ते रविवार 4 आगष्ट रोजी स्थानिक धानोरा रोड वरील महाराजा सेलिब्रेशन हॉल येथे नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन व आदिवासी सामाजिक संघटना , गडचिरोली यांच्या वतीने ‘कोया किंग अँड क्वीन’ या मॉडेलिंग स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उदघाटणीय स्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार देवराव होळी होते, तर रंगमंचावर आरमारी येथील मराठी झाडीपट्टी व बोलीभाषा फेम मोनिका सहारे, सामाजिक कार्यकर्ते वसंत कुळसंगे, दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी अनिल धामोडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, सोनल कोवे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, संयोजिका मनीषा मडावी आदी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

उदघाटनीय स्थानावरून बोलताना, मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, आदिवासी समाजाचे देशासाठी वैभव व गौरवशाली इतिहास असून हे टिकवून ठेवणे काळाची गरज असून येणारी भावी पिढी हेच आदर्श व प्रेरणा घेऊन विकासाकडे वाटचाल करतील असा आशावाद व्यक्त करून, गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल असून या ठिकाणी आदिवासी समाजाची रूढी, परंपरा, संस्कृती जपल्या जात आहे, त्यामुळे या पुढे आता मॉडेलिंगचे पुढचे सिझन मोठ्या शहरात घेऊ यात आदिवासी समाजाचे मॉडेलिंग स्पर्धा , चर्चा, परिसंवाद , संम्मेलने घेऊन नागपूर, मुंबई सारख्या शहरी भागात सादरीकरण करू त्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे ठणकावून सांगितले व मोलाचे मार्गदर्शन केले.

याच प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून आमदार देवराव होळी यांनी, आदिवासी समाजाचे परंपरा व प्रामुख्याने भाषा टिकवून ठेवून आपली ओळख जगाला दाखवून देऊ आणि समाजाचा सर्वांगीण विकास करू असे विचार व्यक्त केले.

यावेळी महाराष्ट्र राज्या सोबतच विविध राज्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होऊन आदिवासी परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडविले. विजेत्यांना डोक्यावर ताज, आकर्षक पारितोषिक , प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले.