पोस्टे आरमोरी हद्दीतील ठाणेगाव येथील सेवानिवृत्त वृध्द परिचारिकेच्या घरात घुसुन जबरी चोरी करणा­या चार (04) आरोपींना गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद

32

 

पोस्टे आरमोरी हद्दीतील ठाणेगाव येथील सेवानिवृत्त वृध्द परिचारिकेच्या घरात घुसुन जबरी चोरी करणा­या चार (04) आरोपींना गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद

 

 01 विधीसंघर्षग्रस्त बालकासह 03 आरोपींचा गुन्हयात होता सहभाग

 

सविस्तर वृत्त असे आहे की, आरमोरी पोलीस ठाणे येथुन 03 कि.मी. अंतरावर असलेले मौजा ठाणेगाव (नवीन) येथे राहणा­या सेवानिवृत्त परिचारीकेच्या घरात दिनांक 29/07/2024 रोजीचे 10.45 ते 12.30 वा. सुमारास 03 अज्ञात चोरटयांनी प्रवेश करुन त्यांचे हातपाय खुर्चीला बांधुन त्यांच्या घरातील कपाटामध्ये, ड्रेसींग टेबल येथे ठेवलेले व त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच हातात असलेली सोनाटा कंपनीची वॉच असा एकुण 3,49,500/- (तीन लाख एकोणपन्नास हजार पाचशे) रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरुन नेला आहे, असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस ठाणे आरमोरी येथे अपराध क्र. 209/2024 कलम 309(4), 306(क), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली चे पोलीस निरीक्षक श्री. उल्हास भुसारी व त्यांचे अधिकारी व अंमलदार तसेच पोस्टे आरमोरी पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवुन तंत्रशुध्द पध्दतीने करुन सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा शोध लावला असुन यातील आरोपी नामे 1) अंकित भिमराव लटारे वय-24 वर्ष, रा. ठाणेगाव, 2) प्रशांत विलास राऊत वय-22 वर्ष रा. रामाळा यांना दिनांक 06/08/2024 रोजी व यातील फरार आरोपी 3) प्रतिक राजु भुरसे वय-23 वर्ष, रा. ठाणेगाव याचा शोध घेवुन आरमोरी पोलीसांनी त्यास काल दि. 07/08/2024 रोजी जेरबंद केले आहे, तसेच सदर गुन्हयात सहभागी असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक वय 17 वर्ष 06 महिने रा. ठाणेगाव यास ताब्यात घेवुन त्याला बालसुधारगृहात रवाना करण्यात आले.

सदर गुन्हयातील तिन्ही अटक आरोपितांना मा. न्यायालयासमोर हजर केले असता, मा. न्यायालयाकडुन सदर आरोपितांना दि. 12/08/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अटक आरोपितांकडे गन्हयाच्या अनुषंगाने अधिक चौकशी केली असता आरोपी अंकित भिमराव लटारे हा सदर गुन्हयाचा प्रमुख सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयातील मुद्देमाल छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे लपवुन ठेवला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर मुद्देमाल आरोपिंताकडुन हस्तगत करण्यात आला. तसेच अटक आरोपितांचा यापुर्वी सुध्दा अशाच प्रकारच्या आणखी कोणकोणत्या गुन्हयात सहभाग होता याबाबत पोलीस दलाकडुन कसुन शोध घेण्यात येत आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे आरमोरीचे पोउपनि विजय चलाख हे करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. श्री. उल्हास भुसारी, पोस्टे आरमोरीचे प्रभारी अधिकारी पोनि. श्री. विनोद रहागंडाले, स्थानिक गुन्हे शाखेचे व पोस्टे आरमोरी अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली आहे.

।।।।।।।।।।।।।