*नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री आत्राम पोहोचले अतिदुर्गम गावात*

25

*नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री आत्राम पोहोचले अतिदुर्गम गावात*

 

*नारगुंडा परिसरातील अनेक गावातील नागरिकांशी साधले संवाद*

 

भामरागड:तालुक्यातील बरेच गावातील नागरिक शासकीय कामानिमित्त वारंवार जिल्हा किंवा तालुका मुख्यालयात जाऊ शकत नाहीत.किंबहुना शेतीची कामे देखील सुरू आहेत.त्यामुळे स्वतः राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः अतिदुर्गम नारगुंडा गाठले.

 

गावातील गोटूल परिसरात आयोजित सभेत प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, मिरगुडवंचाचे सरपंच पूनम पदा,राकॉचे तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार,गाव पाटील दलसू पुंगाटी,मनोहर येमुलवार,पिडमिलीचे कोमटी जेट्टी,कोटीचे पाटील कन्ना हेडो,कियर बैसू वाचमी,ऍड प्रसाद मेंगनवार,सामाजीक कार्यकर्ते इरफान पठाण,सेवानिवृत्त शिक्षक रतन दुर्गे तसेच आदी परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

 

सुरुवातीला जमलेल्या कुचेर,खंडी, नैनवाडी,विसामुंडी,मर्दु,पीडमिली,हलवेर,मिरगुडवंचा व आदी परिसरातील नागरिकांना बोलते करून मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रत्यक्ष समस्या जाणून घेतली.यावेळी परिसरातील नागरिकांनी गावात गोटूल बांधकाम, सिमेंट रस्ते,नाली बांधकाम,धान खरेदी केंद्र,परिसरात उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली.विशेष म्हणजे या भागातील आदिवासी बांधवांना अजूनही काही लोकांकडे जमिनीचे पट्टे नसल्याचे सांगितले. तात्काळ मंत्री आत्राम यांनी भामरागडचे नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार यांना गावात बोलावून नागरिकांच्या समक्ष तक्रारीची नोंद घेऊन त्वरित समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.

 

तर आदी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विविध विभागांच्या प्रमुखांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून फटकारले.यावेळी मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांनी महायुतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक योजनेची माहिती शेवटच्या घरापर्यंत पोहोचवून दुर्गम भागातील नागरिकांना या योजनांचा लाभ कसा देता येईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.दरम्यान गावात आगमन होताच उपस्थित नागरिकांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे जंगी स्वागत केले.