*जर्मन भाषेच्या मोफत प्रशिक्षणातून मिळवा जर्मनीत नोकरीची संधी*  *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून अर्ज आमंत्रित*

22

*जर्मन भाषेच्या मोफत प्रशिक्षणातून मिळवा जर्मनीत नोकरीची संधी*

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून अर्ज आमंत्रित*

*विविध 30 ट्रेड्स मधील कौशल्यधारकांना मागणी*

 

गडचिरोली दि.20 : जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यास विविध क्षेत्रातील 30 ट्रेडसमधील 10 हजार कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. हे मनुष्यबळ पुरविण्यासाठी राज्य शासनासोबत सामंज्यास्य करार झाला असून प्रत्येक जिल्ह्यातील 150 ते 250 उमेदवारांना 4 महिने जर्मन भाषा व शिष्टाचार तसेच आवश्यकतेनुसार कौशल्यवृध्दीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याकरीता जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत कौशल्यधारक उमेदवारांकडून www.ac.in/GermanyEmployment या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

आरोग्य सेवेतील परिचारिका, वैद्यकीय सहायक, प्रयोगशाळा, रेडियोलॉजी, दंतशल्य सहाय्यक, आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रुषा सेवक, फिजिओथेरपीस्ट, दस्तऐवजीकरण आणि संकेतीकरण,लेखा व प्रशासन, आतिथ्य सेवांमधील वेटर्स, सर्व्हर्स, स्वागत कक्ष संचालक, रिसेप्शनिस्ट, आचारी, हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल, हाऊसकिपर, क्लीनर, स्थापत्य सेवांमधील विद्युततंत्री, नविनीकरण उर्जेमधील विशेष विद्युततंत्री, औष्णिक विजतंत्री, रंगारी, सुतार, वीट/फरशी करिता गवंडी, प्लंबर्स, नळ जाडारी, वाहनाची दुरूस्ती करणारे मेकॅनिक, यासोबतच वाहन चालक (बस, ट्राम, ट्रेन, ट्रक), सुरक्षा रक्षक, टपाल सेवा वितरक, सामान बांधणी व वाहतूक करणारे (पॅकर्स व मुव्हर्स), विमानतळावरील सहायक, स्वच्छताकर्मी, सामान हाताळणारे, हाऊसकीपर, विक्री सहाय्यक, गोदाम सहायक इत्यादी क्षेत्रातील कौशल्यधारकांची निवड केल्या जाणार आहे.

राज्यात उपलब्ध कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियन मधील देशांना करता यावा व त्यायोगे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येवून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी आणि दोन्ही देशांमधील संबंध सदृढ व्हावे, त्यातून सशक्त सामाजिक व आर्थिक बदलांची सुरूवात जागतिक स्तरावर होऊन मोठ्या प्रमाणात परकीय चलन व तंत्रज्ञान प्राप्त होईल हा शासनाचा या योजनेमागील दृष्टीकोन आहे.

जिल्हयातील पात्र विद्यार्थी, कुशल कामगारांना जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत गडचिरोलीतील जे. टी.पाटील अध्यापक विद्यालय,धानोरा रोड, शिवाजी हायस्कूल गोकुळ नगर, विद्याभारती कन्या विद्यालय, संत गाडगे महाराज विद्यालय, साईनाथ अध्यापक विद्यालय मुरखडा या पाच ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात आले आहे. तसेच प्रशिक्षण देण्याकरिता विहित अे-1, अे-2, बी-1, बी-2, सी-1, सी-2 परिक्षा उत्तीर्ण इच्छुक शिक्षकांनी https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7 या लिंकद्वारे गुगल फॉर्मवर अर्ज करावे, आवश्यकतेनुसार त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चापले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

000