*पोळा* (‘ पुलाला ‘, ‘बेंदूर’, ‘मट्टू पोंगल’, ‘गोधन’)
*प्रस्तावना* : पोळा हा सण विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश आणि तेलंगणा सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. तेलंगणाच्या उत्तरेकडे भागात बैलपोळा सणाला ‘ पुलाला ‘ अमावस्या म्हटले जाते. मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये ‘बेंदूर’ असे म्हणतात. तर दक्षिणेत या सणाला ‘मट्टू पोंगल’ आणि उत्तर व पश्चिम भारतात ‘गोधन’ असे म्हणतात.
पौष महिन्यात मट्टू पोंगल, आषाढी एकादशीनंतर महाराष्ट्रीय बेंदूर तर श्रावण आमावस्येला बैल पोळा साजरा करतात. हे सण साजरे करण्याची पद्धत जवळजवळ सारखीच आहे. पोळा या सणाचे महत्त्व जाणून घेऊया.
पोळा हा बैलांचा उत्सव. शेतकर्यांना उत्साहीत करणारा असा हा उत्सव आहे. अनंत कष्ट करून अन्नधान्याचे उत्पादन करणार्या शेतकर्याला आनंदी पहाणे कोणाला आवडणार नाही. या दिवशी सगळे शेतकरी बंधू मोठ्या उत्साहात आणि आनंदात असतात.
*तिथी* : पोळा हा उत्सव प्रदेशानुसार आषाढ, श्रावण वा भाद्रपद मासात साजरा केला जातो. श्रावण अमावस्या ‘पिठोरी अमावस्या’ असेही म्हणतात.
*उद्देश* : १. या उत्सवाद्वारे बैलांविषयी एकप्रकारे कृतज्ञता व्यक्त केली जाते.
२. निसर्गावर प्रेम करायला शिकवणारा.
३. हा उत्सव साजरा केल्याने शेतात भरपूर धान्य पिकते आणि गोधन वाढते, असे समजले जाते.
४.‘पोळ्याच्या दिवशी जे प्राणीमात्र आपल्या कष्टाने मानवाच्या जीवनाला आधारभूत झालेले आहेत, त्यांची पूजा आणि स्मरण केले जाते. यातून साधकाला गुरूंद्वारे कळते की, जशी माझ्यात ईशशक्ती कार्य करत आहे, तशीच या जगात निरनिराळ्या माध्यमांतून ती ईश्वरी सेवा म्हणून कार्य करत आहे. ही व्यापक दृष्टी निर्माण व्हावी, हा या उत्सवाचा उद्देश आहे.’
– प.पू. परशराम पांडे महाराज, असे म्हणतात.
*उत्सव साजरा करण्याची पद्धत* :
शेतकर्यांमध्ये या उत्सवाला फार महत्त्व आहे. पेरण्या झाल्यानंतर शेतीच्या कामांतून बैल रिकामे झाले म्हणजे त्यांना न्हाऊ-माखू घालायचे,पूजा करतात, औक्षवण करतात, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. बैलांना रंगवून आणि सजवून वाजंत्री सह त्यांची गावातून मिरवणूक काढतात. वर्षभरात कष्ट करणाऱ्या आपल्या सर्जा राजाला या दिवशी पूर्ण विश्रांती देतात. असा हा उत्सव आनंदाचा सोहळा असतो. मुले शिक्षण नोकरी निमित्त शहरात गेले असले तरीही पोळ्याला सगळे घरी येतात.
ज्यांच्याकडे शेती नाही ते यादिवशी मातीच्या बैलांची पूजा करतात. अश्या प्रकारे प्रत्येक घरात बैलांची पूजा करतात.
विदर्भातील सर्व भागात ‘बैलपोळा’ आणि ‘तान्हा पोळा’ असे दोन सण दोन दिवस साजरे केले जातात. म्हणूनच विदर्भातील पोळा सण वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळावेगळा आहे. विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांमध्ये हा सण साजरा करण्याचा विविध प्रथा आहे. त्या प्रत्येकाचा स्वतंत्र इतिहास आहे. त्या विषयी माहिती या लेखातून जाणून घेऊ.
*नागपूर जिल्ह्यातील पोळा :* नागपूरचे राजे रघुजीराव भोंसले-द्वितीय यांनी १८०६ मध्ये४.‘पोळ्याच्या मुलांसाठी तान्हा पोळा सुरू केला. ते दूरदृष्टी ठेवून कार्य करीत असे. शेती आणि शेतकरी हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते. शेतीकडे ते एक व्यवसाय म्हणून नव्हे तर ‘परंपरा आणि संस्कृती’ म्हणून पाहत असे. एकदा नेहमी प्रमाणे पोळ्याची तयारी करीत असताना लहान मुले सगळी तयारी कुतूहलाने पाहत आहे असे त्यांच्या लक्षात आले. मुलांमधे शेती आणि शेतकरी यांच्या विषयी जवळीक आणि जिज्ञासा निर्माण व्हावी म्हणून राजे रघुजीराव भोंसले-द्वितीय यांनी लहान मुलांसाठी ‘तान्हा पोळा’ सुरू केला.
श्रावण अमावस्येला साजरा होणाऱ्या मोठया बैलांच्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असतो. लहान मुलांना मोठा बैल सांभाळणं कठीण असतं, म्हणून महाराजांनी चाकं असलेला लाकडाचा बैल तयार करून घेतला. मोठ्या बैलांचा जसा पोळा सण साजरा करतात, तसाच हा उत्सव सुरू केला. बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली. मोठ्या पोळ्यातील सगळ्या गोष्टी या तान्ह्या पोळ्यात सुरू केल्या. बैलाची पूजा झाल्यावर ‘पोळा फुटला’ अशी दवंडी दिली जायची. हा सण लहान मुलांसाठी असल्यामुळे महाराज त्या मुलांना खाऊ आणि इतर भेटवस्तू देत.
आजही विदर्भात सर्वत्र ही परंपरा सुरू आहे. या निमित्याने मुलांची पारंपरिक वेशभूषा आणि बैल सजावट, छोटा देखावा, तसेच त्यातून सामाजिक संदेश यांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. पोळा फुटल्यावर मुले प्रथम स्वतःच्या घरी जातात. तिथे बैलाचे आणि मुलांचे औक्षवण करून खाऊ आणि पैसे देतात. मग मुले बैल घेऊन शेजार पाजारी जातात. या दिवशी भिजवलेली चण्याची डाळ आणि काकडी हा मुख्य प्रसाद असतो. घरी तसेच पोळ्याच्या ठिकाणी हा प्रसाद सगळ्यांना देतात.
नागपुरातील पोळ्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ‘मारबत आणि बडग्याचा उत्सव’ असतो. समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्दे आणि स्थानिक समस्या यावर भाष्य करणारे फलक असतात. मारबत म्हणजे प्रतीकात्मक पुतळे बनवलेले असतात. हे पुतळे भव्य असतात. यात काळी आणि पिवळी मारबत मुख्य आकर्षण असते. ही परंपरा १८८१ पासून सुरु झाली. ‘मारबत आणि बडग्या’ हा जगातील एकमेव असा मिरवणूक प्रकार केवळ नागपुरातच आहे. ही मिरवणूक देश विदेशातील लोकांसाठी कुतूहलाचा विषय आहे.
*यवतमाळ जिल्ह्यातील पोळा* : यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुक्यातील ‘ हर्सुल ‘ हे छोटे गाव आहे. या गावचा पोळा ‘झडत्यांसाठी ‘ प्रसिद्ध आहे. ‘झडत्या ‘ म्हणजे चारोळीसारखा किंवा शीघ्र काव्यप्रकार आहे. झडत्यांच्या माध्यमातून शेतकरी आपल्या मनातील भाव व्यक्त करतात. त्यात मनातील दुःख, उद्वेग, सरकारी यंत्रणां विषयी रोष, नैसर्गिक आपत्ती इत्यादींचा समावेश असतो. पोळ्यात खड्या आवाजात लयबध्द ‘झडत्या ‘ सादर करतात. त्याच्या साथीला अन्य शेतकरी बांधव ‘हर हर महादेव’ असा जयघोष करतात.
यवतमाळ जिल्ह्यातील दुसरा प्रसिद्ध पोळा तो पुसद तालुक्यातील बेलोरा या पैनगंगेच्या काठावरील गावातला आहे. यात बैलांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. पोळ्याच्या दिवशी बैलांचे न्हाणे-धुणे होते. त्यानंतर बैलांच्या शिंगांना आणि अंगाला रंगवतात. त्यावर तीन-चार फुटांचे आकर्षक बाशिंग, गळ्यात घुंगरू माळ, पितळी साखळ्या, कपाळावर शिंपल्या-कवड्यांचे सुंदर पान, पायात पोडाळ- पैंजण, पाठीवर नक्षीकाम केलेली सुंदर झुल असे सजलेले बैल गावातील मंदिराच्या मैदानात एकत्र येतात. टाळमृदंगाच्या ठेक्यावर बैल ऐटदार चालीने मार्गक्रमण करीत असतात. त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. परीक्षक मंडळी बैलाचे रूप, सजावट आणि ऐटदार चाल पाहतात . या स्पर्धेत उत्तम बैलजोड्यांना पुरस्कार देण्यात येतात. येथील तान्हा पोळा सुद्धा प्रसिद्ध आहे.
*अमरावती जिल्ह्यातील पोळा* : येथील तिवसा गावात तान्हा पोळ्यानंतर लगेच महिलांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पोळा भरविण्यात येतो. महिला बैलांचा साजशृंगार करतात. या बैलजोड्या महिलाच तोरणाखाली आणतात. सुमारे ७० ते ८० बैलजोड्यांचा सहभाग असतो. हा आगळावेगळा बैलपोळा लक्षणीय ठरला आहे.
*काळाची गरज* : आजच्या यंत्र युगात सगळी कामे यंत्राच्या साहाय्याने करण्याकडे कल वाढला आहे. याला शेती सुद्धा सुटली नाही. जी कामे पूर्वी गोधन म्हणजे बैल करत असत, ती सगळी कामे यंत्राच्या साहाय्याने होऊ लागली आहेत. यंत्राने होणारी कामे कमी कष्टात आणि कमी वेळेत होत असल्याने गोधनाचा सांभाळ करणे काही शेतकरी टाळू लागले आहेत. शेतीत केवळ कष्ट करणारे नाही तर शेतीसाठी नैसर्गिक शेण खत आणि गोमूत्र च्या रूपात नैसर्गिक कीटकनाशक देणारे गोधन झपाट्याने कमी होऊ लागले आहे. दररोज गोधनाचा मोठ्या प्रमाणात वध होत आहे. असेच होत राहिले तर कृषिप्रधान भारताला वैभव संपन्न करणारी गोमाता आणि गोधन काही दशकानंतर केवळ पुस्तकात बघायला मिळेल. गो मातेत तेहत्तीस कोटी देवता वास करतात अशी मान्यता हिंदु धर्मात आहे. गाय मानवासाठी बहु उपयोगी आहे. म्हणूनच धर्म, परंपरा आणि निसर्ग यांचे रक्षण होण्यासाठी, पर्यायाने मानवाचे रक्षण होण्यासाठी गो माता आणि गो धनाचे पालन, पोषण आणि रक्षण पुन्हा व्हायला हवे. तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने समृध्द होईल.
*संदर्भ : सनातन संस्था आणि अन्य संकेतस्थळावरून*
सौजन्य : सनातन संस्था
संकलक : श्रीमती विभा चौधरी
संपर्क क्रमांक :7620831487