*ज्येष्ठा गौरी – अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी चे व्रत!* 

22

*ज्येष्ठा गौरी – अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी चे व्रत!*

 

भाद्रपद मासात येणार्‍या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात. या व्रतामागील इतिहास आणि सण साजरा करण्याच्या पद्धती तसेच हल्ली आधुनिकतेच्या नावाने या पवित्र व्रतात होणाऱ्या चुकीच्या गोष्टीमुळे होणारी व्यक्तीच्या साधनेची आणि धर्म हानी या विषयी सदर लेखातून जाणून घेऊया.

 

*तिथी* : भाद्रपद शुद्ध सप्तमी या दिवशी अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुळाचाराप्रमाणे गौरीचे आवाहन करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अष्टमीला (याला दुर्गाष्टमी असेही म्हणतात) ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा करून महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीला मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात.

 

 

*इतिहास आणि उद्देश* : पुराणात अशी कथा आहे, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्रीमहालक्ष्मी गौरीला शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्रीमहालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.

माहेरवाशीण म्हणून पूजली जाणारी गौर ही अनेक ठिकाणी गणपतीची आई म्हणून पूजतात, तर अनेक ठिकाणी ज्येष्ठा-कनिष्ठा अशा बहिणींच्या स्वरूपात पूजल्या जातात.

 

 

*व्रत करण्याची पद्धत :*

1. हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्‍या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. विदर्भात बहुतेक सगळ्यांकडे उभ्या कोथळ्यांवर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवून कुळाचाराप्रमाणे सोने, चांदी, खडे, मोती च्या अलंकारांनी सजवतात. बहुतेकांच्या घरी सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. – ही एक रूढी आहे.

 

2. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात. मोदक, करंज्या, सांजोऱ्या, वेणी ,फणी यांचा फुलोरा महालक्ष्मींना चढवला जातो. अनेक ठिकाणी तो डोक्यावर बांधतात, तर कित्येक ठिकाणी त्यासाठी महालक्ष्मींच्या वस्त्रांमध्ये खास जागा करून तिथे तो बांधुन ठेवतात. विदर्भात महालक्ष्मींसाठी कोशिंबीर, चटण्या, मोदक, पुरणपोळी, वडे, भजी, कढी, आंबील, पंचामृत, 16 भाज्यांपासून तयार केलेली भाजी, त्याशिवाय एक पातळ भाजी आणि एक सुकी भाजी, लाडू, भात-वरण अशा विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. यात आंबील ला विशेष महत्व आहे. नैवेद्य दाखवल्या महालक्ष्मी बसवल्या तिथले दार खिडक्या बंद करुन सगळे तिथून अन्य खोलीत जातात. महालक्ष्मीना जेवायला वेळ दिल्या जातो. आजही विदर्भात महालक्ष्मी जेवतांना कुणालाच पाहु देत नाही. साधारण अर्ध्या तासाने दार उघडुन सगळे आत येतात.

 

3. तिसर्‍या दिवशी गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.’

 

 

*अशौच असेल, तर गौरी आवाहन आणि पूजन करू नये :* भाद्रपदातील महालक्ष्मीच्या (गौरीच्या) वेळी अशौच असेल, तर गौरी आवाहन आणि पूजन करू नये. अशौचामुळे तेव्हा गौरीपूजन न करता आल्याने काही जण पुढे आश्विन मासात (महिन्यात) गौरीपूजन करतात, पण तसे करू नये. अशा प्रसंगी त्याचा लोप करणे (म्हणजे ते न करणे) युक्त होय.

 

 

*दोरकग्रहण* :

1.‘ज्येष्ठा गौरीच्या पूजेच्या वेळी दोरक ठेवून विसर्जनानंतर तो दोरक घेतला जातो. दोरक घेण्याच्या विधीस ‘दोरकग्रहण’ असे म्हणतात. दोरक म्हणजे हाताने काढलेल्या सुताचे सोळा पदरी हळदीत भिजवून रंगवलेले सूत्र होय. सोळा ही संख्या लक्ष्मीशी निगडित असल्यामुळे दोरकातही सोळा पदर असतात.

 

2.हा दोरक अत्यंत शुभकारक आणि लक्ष्मीप्राप्ती करून देणारा असतो. घरातील सर्व स्त्रिया दोरक धारण करतात. काही प्रांतांत पुरुषही आपल्या हातात हा दोरक धारण करतात. काही जण हा दोरक आपल्या धनकोशात, धान्यकोठारात, वास्तूच्या पायात आणि देवघरात ठेवतात.

 

3.ज्येष्ठा गौरीपूजन हा एक कुळाचार आहे. त्यामुळे कोश (मिळकतीचे साधन) आणि चुली (स्वयंपाकघर) निराळे होताच प्रत्येक स्वतंत्र कुटुंबात हे व्रत करणे अत्यावश्यक असते.’

 

 

*ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्यामुळे होणारी फलप्राप्ती :*

*1.सौभाग्याचे रक्षण होणे* :

काही वेळा स्त्रिया स्वत:च्या सौभाग्याचे रक्षण होण्यासाठी श्री महालक्ष्मीदेवीला उद्देशून ज्येष्ठा गौरीचे व्रत करतात. त्यामुळे व्रत करणार्‍या स्त्रियांवर महालक्ष्मीदेवीची कृपा होऊन त्यांच्या सौभाग्याचे रक्षण होते.

 

*2.ऐहिक आणि पारमार्थिक लाभ होणे :*

ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्याने श्री गणेशासह रिद्धी आणि सिद्धी यांचे कृपाशीर्वाद लाभून ऐहिकदृष्ट्या भरभराट होते अन् आध्यात्मिक क्षेत्रात विविध सिद्धींची प्राप्ती होते.

 

*3.गणेशतत्त्वाचा पूर्ण लाभ होणे* :

रिद्धी आणि सिद्धी यांसह कार्यरत असणारे गणेशतत्त्व पूर्ण असल्यामुळे ज्येष्ठा गौरीचे व्रत केल्याने उपासकाला गणेशतत्त्वाचा पूर्ण लाभ होतो.

 

*आधुनिकतेच्या नावाखाली धर्म हानीचे पातक करू नका!*

हल्ली आधुनिकतेच्या नावाखाली गौरी काही ठिकाणी धर्मशास्त्रात सांगितलेल्या नुसार न मांडता वेगळ्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले आहे. कुठे मास्क लावलेल्या, कुठे गळ्यात पर्स, हातात प्रवासाची बॅग आणि डोळ्यांना काळा चष्मा लावून स्कुटिवर बसलेल्या दाखवतात.

धर्म शास्त्रानुसार ज्या ठिकाणी देवतेचे नाव किंवा रूप आहे, तिथे त्या देवतेची शक्ती असते. म्हणजेच अस्तित्व असते. असे असतांना आपली हौस म्हणून किंवा आधुनिकता दाखवण्यासाठी, तसेच सामाजिक माध्यमांद्वारे प्रसिध्दी मिळवण्यासाठी महालक्ष्मीला निरनिराळ्या रूपात दाखवणे योग्य आहे का? असे केल्याने धर्म हानिचे पातक लागते. शिवाय या कृतींमध्ये भक्ती-भाव नसल्याने देवतेची कृपा होत नाही. म्हणूनच ऐहिक आणि पारमार्थिक लाभ होण्यासाठी, तसेच श्री महालक्ष्मीची कृपा संपादन करण्यासाठी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार पूजन करायला हवे.

 

 

*गौरी आणि श्री गणेश यांना प्रार्थना !*

‘हे गौरी आणि श्री गणेशा, तुमची कृपादृष्टी सर्वांवर अशीच अखंड राहू दे आणि सर्वांना धर्माचरण तसेच साधना करण्याची सुबुद्धी होऊ दे. व्यष्टी साधना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांमध्ये येणारे सगळे अडथळे दूर होऊ दे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’