*जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट*
*नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन*
गडचिरोली दि. 9 : भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे गडचिरोली पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट तर त्यापुढील 48 तासाकरिता येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी केले आहे.
हवामान विभागाने दि. 9 सप्टेंबर करिता रेड अलर्ट तर दि. 10 व 11 सप्टेंबर रोजी येलो अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी धातुजन्य वस्तु, विद्युत खांब वा झाडाजवळ राहू नये, झाडाखाली आसरा घेवू नये. मुसळधार अति मुसळधार पाऊसामुळे नदी, नाले, ओढे यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदीकिनाऱ्यावरील गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी/ नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये. तलाव / बंधारा / नदी इत्यादी ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी जाणे टाळावे व धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह करून नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
०००