*गत दोन दिवस पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा*
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. ११: विभागात गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गत दोन दिवस पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणीकरुन तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विभागीय आयुक्तांकडून त्यांनी आढावा घेतला.
गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात बाघ, वैनगंगा, बावनथडी नद्यांना पूर आला. गोंदिया जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला. या तीन जिल्ह्यातील 1022 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी प्रशासनाने हलविले. पावसाच्या पाण्यामुळे एकूण 47 मार्गांवर गतिरोध उत्पन्न झाले असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. यातील सर्वाधिक 35 ठिकाणे एकट्या गोंदिया जिल्ह्यात आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे हळहळू पाणी ओसरत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यावर मात करण्यासाठी एसडीआरएफच्या 2 तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन चमूंच्या 3 तुकड्या कुठल्याही स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गडचिरोली, भामरागड, सिरोंचा येथेही आपत्ती व्यवस्थापनाच्या चमू सज्ज आहेत. प्रशासनाला दक्षतेचे निर्देश दिले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
00000