अन अनर्थ टळला

179

अन अनर्थ टळला

ट्रक घुसला घरात

पादचारी मुलीला वाचवण्यासाठी ट्रक रोडच्या कडेला घुसल्याची घटना घडली

यात 4 मोटर सायकल चे नुकसान झाले तर 4 किरकोळ जखमी आहेत.

सावली:-  येथील बसस्थानक परिसरात आज (दि 1) रोजी पादचारी मुलीला वाचवण्यासाठी ट्रक रोडच्या कडेला घुसल्याची घटना घडली. यात 4 मोटर सायकल चे नुकसान झाले तर 4 किरकोळ जखमी आहेत. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
सावली शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वास आले असून दुभाजकाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नसल्याने बस स्थानक परिसरात प्रवासी ॲटो, चार चाकी वाहन, मोटारसायकल रस्त्याच्या कडेलाच उभ्या केल्या जातात. त्यामुळे चारचाकी वाहन चालक व पादचारी यांना अडथळा निर्माण होत असून वाहन चालवताना वाहकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच परिसरात हातठेले, फळविक्रेत्यांनी रस्त्यावर आपली दुकानदारी थाटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराने रस्ता बांधकामानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तात्पुरत्या स्वरूपातील साईड बम्म भरणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष केल्याने शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग अपघातास आमंत्रण देणारा ठरत आहे.
सावली हे तालुक्याचे मुख्यालय असून या शहरात मुख्य बाजारपेठ आहे, शाळा, महाविद्यालय आहेत. त्यात शाळा, महाविद्यालयाची सुट्टी नंतर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. लोक बाजारपेठेत येत असल्याने रेलचेल सुध्दा वाढली आहे. त्यामुळे बसस्थानक व बाजार चौक परिसरात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बस स्थानक व बाजार चौक परिसरात वाहतूक शिपायाची नेमणूक करण्याची मागणी जोर धरत आहे.