*जिल्ह्यातील 13 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र*

10

*जिल्ह्यातील 13 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र*

 

*प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी ऑनलाईन उद्घाटन*

 

*जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्वतयारीचा आढावा*

 

*गडचिरोली दि.17 : व्यावसायीक शिक्षणाचे महत्व ओळखून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीकोणातून राज्यातील एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येत आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातील 13 केंद्रांचा समावेश असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 सप्टेंबर रोजी, दुपारी 12.30 वाजता आभासी पद्धतीने वर्धा येथून या केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याबाबत गडचिरोली येथील केंद्रांचे उद्घाटन संदर्भात पूर्वनियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज घेतला.

 

या 13 महाविद्यालयांमध्ये उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी इंटरनेट व अखंडित विद्युत सुरू राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था ठेवण्याचे निर्देश श्री दैने यांनी दिले. यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्याच्या सूचना दिल्या. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केले.

 

केवळरामजी हरडे कॉलेज ऑफ एग्रीकल्चर चामोर्शी, केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, एडवोकेट एन.एस. गंगुवार कॉलेज ऑफ एज्युकेशन गडचिरोली, श्री.एम. एस. कोवासे कॉलेज ऑफ फार्मसी, गडचिरोली, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, इंदिरा गांधी महाविद्यालय,गडचिरोली, गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेज गडचिरोली, महात्मा गांधी आर्ट्स, सायन्स अँड लेट एन. पी.कॉमर्स कॉलेज, राजे धर्मराव आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज अल्लापल्ली, श्री.किसनराव खोब्रागडे महाविद्यालय वैरागड तालुका आरमोरी,जिल्हा गडचिरोली, श्री.सद्गुरु साईबाबा सायन्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टी, महिला महाविद्यालय गडचिरोली,श्री.जे.एस.पी.एम. आर्ट्स,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज धानोरा अशा 13 महाविद्यालयांची आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रासाठी जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे.

 

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी या केंद्राच्या स्थापनेबाबत माहिती दिली. जिल्हा कौशल्य विकास समन्व्यक वर्षा कोल्हे यांच्यासह 13 महाविद्यालयांचे प्राचार्य आणि समन्वयक यावेळी उपस्थित होते.

000