*चोवीस तासात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा; अन्यथा गडचिरोली न.प. मुख्याधिकारी सूर्यकांत पिद्दूरकर यांच्या दालनात मोकाट जनावर आणून कोंढणार..!*
*शिवसेना (उबाठा) जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचा इशारा…*
गडचिरोली:वृत्तवाणी न्युज
जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरात मोकाट जनावरांची समस्या निर्माण झाली आहे. जनावरे शहरातील चारही मुख्य मार्गावर चक्काजाम आंदोलन केल्यासारखे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडतात. त्यामुळे वाहतूकीची समस्या निर्माण झाली असून अपघाताचा धोका वाढला आहे. नगर पालिका प्रशासनाने येत्या चोवीस तासात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मोकाट जनावरांना आणून मुख्याधिकारी यांच्या दालनात कोंढण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला आहे.
गडचिरोली शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढली असून चंद्रपूर, आरमोरी, चामोर्शी व धानोरा या चारही महामार्गावर जनावरांचा मुक्त संचार संचार वाढला आहे. जनावरांना चारापाण्याची सोय करावी लागू नये म्हणून शहरातील पशूपालक आपल्या गाय, बैलांना मोकाट सोडून देतात. त्यामुळे जनावरे जागोजागी रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसतात. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सकाळी व सायंकाळच्या सुमारास शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी रस्त्याने ये.जा करतात. तसेच शहरातील महिला व नागरिक सुध्दा फिरायला निघतात. रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे त्रास सहन करावा लागतो. मोकाट जनावरांमुळे अपघाताच्या घटनासुध्दा घडल्या आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीची नगरपालिका प्रशासनाने गंभिरतेने दखल घेऊन येत्या चोवीस तासात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मोकाट जनावरांना मुख्याधिकारी यांच्या दालनात कोंढण्यात येईल, असा इशारा अरविंदभाऊ कात्रटवार यांनी प्रशासनाला दिला आहे.