जिल्ह्यातील विकासकामे सकारात्मक विचार ठेवून पुर्ण करा

131

जिल्ह्यातील विकासकामे सकारात्मक विचार ठेवून पुर्ण करा

दिशा समितीच्या बैठकीत खासदार तथा अध्यक्ष, अशोक नेते यांचे प्रतिपादन

गडचिरोली,(जिमाका),दि.3 मे:-  आकांक्षित, दुर्गम व मागास गडचिरोली जिल्हयात कोणत्याही प्रकारची विकासकामे करत असताना आधिकारी व पदाधिकारी यांनी सकारात्मक विचार ठेवून ती करावीत असे प्रतिपादन दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी दिशा समितीच्या आढावा बैठकीत केले. जिल्हयात अनेक अडचणी आहेत, प्रत्येक कामात नियम व अडचणी आडव्या आल्या तर विकास कामांची अंमलबजावणी होणार नाही. त्यासाठी नियमाने मात्र आदिवासी दुर्गम भागातील लोकांचा विचार करून सकारात्मक निर्णय घेवून कामे मार्गी लागतील यासाठी प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने कार्य केले पाहिजे असे ते पुढे म्हणाले. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथील सभागृहात जिल्हा विकास, समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्रभारी जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, दिशा समिती सदस्य बाबुरावजी कोहळे, सदस्या तथा नगराध्यक्षा गडचिरोली योगिता पिपरे, सदस्य प्रकाश गेडाम, सदस्या लताताई पुंगाटे, सदस्य डी के मेश्राम, उप विभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, उप वनसंरक्षक कुमारस्वामी व इतर सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हयातील विविध विकास कामांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच दिशा समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या विषयांवर अनूपालन सादर करण्यात आले. यामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा अध्यक्ष तथा खासदार अशोक नेते यांनी घेतला. जिल्हयात आवास योजने अंतर्गत मोठया प्रमाणात कामे शिल्लक आहेत यातील अडचणी सोडविण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. आवास योजना, शौचालय बांधकाम यासाठी लाभार्थींना मोफत रेती मिळावी. नियमानूसार त्यांना या कामांसाठी मोफत रेती नेण्यासाठीची प्रक्रिया सर्व तहसिल कार्यालयात दर्शनी भागात लावा अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. जिल्हयातील विद्यूत विषयाबाबतही चर्चा झाली. कोरची सह धानोरा भागातील शेतीसाठीची वीज समस्या सोडविणे, तसेच घरगूती वीजबीलातील समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश अध्यक्षांनी यावेळी दिले. जिल्हयातील प्रस्तावित रेल्वेमार्गा बाबतही अडचणी सोडविण्यासाठी रेल्वे विभागाला सूचना करण्यात आल्या.

केंद्रातून येणाऱ्या विविध योजनांची सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. यामध्ये मोठया प्रमाणात निधी अखर्चित राहिल्याने तो परत जाण्याची शक्याता असते. म्हणून सदर निधी वेळेत खर्च करावा अशा सूचना अध्यक्षांनी दिल्या. बँकांमार्फत राबविण्यात येत असलेल्या जनधन योजना, बीमा योजना, जीवन ज्योती व मुद्रा योजनांबाबत आढावा घेणेत आला. बँकांनी लाभार्थ्यांला खरी माहिती देवून योजनांची प्रसिद्धी करावी तसेच कोणत्याही केंद्रीय योजना बंद झाल्या नाहीत असे सांगावे. जेणे करून उपलब्ध योजनांचा लाभ गरजू लोकांना होईल असे ते पुढे म्हणाले.
या बैठकीवेळी उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेशकुमार कुमरे यांनी केले.
**