माजरी पोलिसांकडून साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त,दोन आरोपिंना अटक

100

माजरी पोलिसांकडून साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त,दोन आरोपिंना अटक

भद्रावती,दि.३(तालुका प्रतिनिधी)
दारुची तस्करी करणा-या दोन आरोपिंना माजरी पोलिसांनी बुधवार दि.३ मार्च रोजी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून ४ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वणी-वरोरा मार्गावर टाटा इंडिगो वाहन क्र. एम.एच.३४,एए ५१९२ दारुची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती माजरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार ठाणेदार विनीत घागे यांच्या नेतृत्वातील पथकाने वणी-वरोरा मार्गावर नाकाबंदी केली असता वरील क्रमांकाची कार पाटाळा वळणावर थांबविण्यात आली. कारची झडती घेतली असता कारमध्ये ७१ हजार रुपये किंमतीच्या स्टर्लिंग रिझर्व व आॅफीसर चाॅईस कंपनीच्या विदेशी दारुच्या ५ पेट्या आढळून आल्या. या पेट्यासह दारुच्या वाहतुकीसाठी वापरलेली ३ लाख रुपये किंमतीची टाटा इंडिगो कार, पायलेटिंगकरीता वापरलेली ८० हजार रुपये किंमतीची सुझुकी एक्सेस मोपेड क्र.एम.एच.३४, बी.एस.३५७२ आणि गुन्ह्यात वापरलेला ३ हजार रुपये किंमतीचा भ्रमणध्वनी संच असा एकूण ४ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी शुभम अशोक आत्राम (२३) व गणेश सुनील भोयर(२०) रा. बल्लारपूर यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजरीचे ठाणेदार विनीत घागे, सहाय्यक फौजदार किशोर मित्तरवार, पोलिस अंमलदार अतुल गुरनुले, अनिल बैठा, अमोल रामटेके, आकाश चेन्नुरवार, श्रीकांत मोगरम, अविनाश राठोड व गुरु शिंदे यांनी केली.