*जिल्ह्यात कलम ३६ लागू*
गडचिरोली, (जिमाका) दि.22: जिल्ह्यात १५ ऑक्टोबर २०२४ पासुन विधानसभा निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागु झालेली आहे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षाच्या प्रचार फेऱ्या सभा मेळावे इ. कार्यकमांचे आयोजन होणार आहे. निवडणूक मतदान प्रकिया शांत, निर्भय व निपःक्षपाती वातावरणात पार पाडावी याकरीता गडचिरोली जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री निलोत्पल यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्हा कार्यक्षेत्रात २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३६ लागू केले आहे.
यानुसार जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पुढील नमुद केल्या प्रमाणे लेखी अगर तोंडी आदेश देण्याचे अधिकार प्रदान केले आहे. अ) रस्त्यावरुन जाणा-या जमावाचे अगर मिरवणुकीतील व्यक्तीचे वागणे अगर कृत्य याबाबत आदेश देणे ब) ज्या मार्गाने मिरवणुक किंवा जमाव जाईल अगर जाणार नाही ते वेळ व मार्ग निश्चीत करणे क) सार्वजनिक ठिकाणी अगर निवडणूक प्रचारासाठीचे कार्यक्रमाचे वेळी वापरण्यात येणा-या ध्वनीपेक्षकाच्या ध्वनीची तीव्रता, वापराची विहीत वेळ यावर नियंत्रण करणे ड) निवडणुकीचे प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा, रॅली, इ कार्यक्रम घेण्याचे ठिकाण, दिनांक व वेळ याबाबत नियत्रण करणे.
सदरचा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्हा कार्यक्षेत्रात दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ चे ००.०१ वा. पासून ते दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ चे २४.०० वा. पर्यंत लागू राहील. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३४ प्रमाणे कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000