*जिल्ह्यात पशुगणनेला सुरुवात*
*100 कर्मचारी करणार नोंदणी*
गडचिरोली दि. 25 : जिल्हयात 21 व्या पशुगणनेला शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 पासुन सुरुवात होत असुन ही गणना 28 फेब्रुवरी 2025 पर्यंत चालणार आहे. त्यासाठी जिल्हयात 82 प्रगणक व 18 पर्यवेक्षकाची असे एकुण 100 कर्मचाऱ्याची नेमणुक करण्यात आली आहे. 21 वी पशुगणना प्रथमच ऑनलाईन अर्थात ॲपद्वारे करण्यात येणार आहे. पशुगणननेमुळे जिल्हयातील पशुधनाची संख्या निर्धारीत होऊन त्यानुसार राज्य सरकारला धोरण आखता येईल. तसेच योजनामध्ये सुसत्रता आणण्यासाठी याचा फायदा होणार आहे. यामध्ये जिल्हयातील नागरी व ग्रामिण भागात पशुधनाच्या जाती व कुक्कुटपक्षी यांची प्रजातीनिहाय वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे.
जिल्हयात 21 व्या पशुगणनाची सुरुवात 1 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार होती मात्र तांत्रीक कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली होती.
जिल्हयात 2019 मध्ये 20 वी पशुगणना झाली तेव्हा 20 व्या पशुगणनेनुसार जिल्हयामध्ये गाय वर्ग-459471, म्हैस वर्ग- 66259, मेंढया – 18605, शेळया – 239587, वराह – 25210 असे एकुण – 809132 इतके पशुधन असुन कोंबडया, बदके व इतर – 1018969 इतके आहे.
या मोहिमेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कूट यांची गणना केली जाणार आहे. या पशुगणनेच्या अनुसार शासनाकडुन धोरण, योजना आखल्या जातात व त्यानुसार निधीची उपलब्धता केली जाते. शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे त्यानुसार लसीकरण, औषधाचा पुरवठा केला जातो. गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनासहित महत्वाची ठरणार असल्याने आपल्याकडील जनावराची खरी माहिती पशुपालकांनी देण्यात यावी असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विलास गाडगे यांनी केले आहे.