प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

29

प्रशिक्षणाला अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

 

गडचिरोली विधानसभा: निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी १०८ कर्मचाऱ्यांना बजावले नोटीस

 

गडचिरोली: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार आहे. गैरहजर राहिलेल्या १०८ कर्मचाऱ्यांना गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी कारणे दाखवा नोटीस बजावले आहे. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २६ व २७ ऑक्टोंबर रोजी मतदान अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले.

प्रशिक्षणासाठी गडचिरोली, धानोरा व चामोर्शी तालुक्यातील १ हजार ८१९ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचा समावेश आहे.परंतु वेगवेगळी कारणे दाखवून नियुक्ती रद्द करण्यासाठी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज केलेला आहे.प्रशिक्षणात अनाधिकृतपणे १०८ कर्मचारी गैरहजर राहिले. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून तात्काळ खुलासा मागितलेला आहे. प्राप्त झालेला खुलासा उचित व समाधानकारक न वाटल्यास पहिल्या प्रशिक्षणास अनाधिकृत गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे, अशी माहिती गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी दिलेली आहे.