प्रेरणादायी : कुटुंबाचे पोट भरण्यासाठी त्यांनी घर विकून रिक्षा घेतली आणि रिक्षातच राहू लागले…या आजोबांची संघर्ष कथा प्रत्येकाने वाचायला हवी !!
आजकाल काही व्हायरल होणाऱ्या विचित्र गोष्टी पहिल्या की प्रश्न पडतो, यात प्रसिद्ध होण्यासारखं एवढं काय होतं? काहीही बघायचं का? पण आज अशी एक गोष्ट सांगणार आहे जी व्हायरल झाल्यामुळे एका कष्ट करणाऱ्या, एका गरजू आजोबांचं आयुष्य बदलून गेलं आहे. त्यांना झालेली मदत पाहून वाटतं की अजूनही माणुसकी टिकून आहे.
वयाच्या ६० नंतर कोणत्याही वृद्ध माणसाची काय इच्छा असते? आपल्या कुटुंबाबरोबर राहिलेलं आयुष्य सुखाने काढावं. आयुष्यभर कष्ट केलेले असतात आता आराम करावा. आवडणाऱ्या गोष्टी कराव्या, जग पाहावं. पण ७४ वर्षाच्या देशराज आजोबांच्या आयुष्यात असं सुख नव्हतं. देशराज हे मुंबईत रिक्षा चालवतात. गावाकडे असलेले आपले सात माणसांचे कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्यांच्या एकट्याच्या खांद्यावर आहे. त्यांची दोन तरुण मुलं अगदी थोड्या दिवसांच्या अंतराने मृत्यू पावली. नातीच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी राहते घर विकले. कुटुंबातील सर्व जणांना गावी पाठवले. आणि ते एकटे मुंबईत रिक्षातच राहू लागले. डोक्यावर छप्पर नसल्याने रिक्षातच राहायचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांना वयोमानानुसार नीट चालताही येत नाही. पण जबाबदारीमुळे त्यांना थांबता येत नव्हतं. शिक्षक बनण्याचं नातीचं स्पप्न पूर्ण करायचं त्यांनी ठरवलं होतं, त्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर दिवसभर रिक्षा चालवून महिन्याला कसेबसे १० हजार रुपयांपर्यंत त्यांची कमाई होत होती. १० हजारात घर आणि शिक्षण चालणे खूप अवघड झालं होतं. पण अशाही परिस्थितीत ते न खचता रिक्षा चालवत राहिले.
त्यांच्या याच संघर्षाची माहिती देणारी एक पोस्ट Humans of Bombay ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही दिवसांपूर्वी पोस्ट केली होती. ही पोस्ट लगेचच इंटरनेटवर व्हायरल झाली. स्वतःच्या कुटुंबातीसाठी आणि नातीच्या शिक्षणासाठी घर विकणाऱ्या ७४ वर्षांच्या देशराज यांनी नेटकऱ्यांचं मन जिंकलं. त्यांना मदतीसाठी देणगी देण्याचं आवाहन करण्यात आलं आणि घर खरेदीसाठी २० लाख रुपयांची मदत करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. त्याला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. देशभरातून त्यांना मदतीसाठी अनेक दानशूर हात पुढे आले. आणि तब्बल २४ लाख रुपये जमा झाले. नुकताच २४ लाख रुपयांचा धनादेश देशराज यांना देण्यात आला. या मदतीने देशराज भारावून गेले. त्यांनी सर्वांचे आभार मानले
धनादेश दिल्यानंतर ‘ह्यूमंस ऑफ बॉम्बे’ने देशराज यांचा आनंद एका व्हीडीओद्वारे शेयर केला आहे. ‘ह्यूमंस ऑफ बॉम्बे’नेही मदत करणाऱ्यांचे आभार मानले असून “देशराज यांच्या मदतीसाठी तुमच्यासारखे अनेकजण पुढे आले, त्यामुळे आता देशराज यांच्या डोक्यावर छप्पर असेल आणि त्यांच्या नातीचं शिक्षणही पूर्ण होईल…धन्यवाद “अशी पोस्ट केली.
अगदी क्षुल्लक कारणांवरून खचून जाणाऱ्या तरुणाईला देशराज यांचा संघर्ष डोळ्यात अंजन घालणारा ठरेल यात शंका नाही.