*गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १० व ११ नोव्हेंबर रोजी गृहमतदान*
*१५७ मतदारांसाठी २१ मतदान पथके*
गडचिरोली दि ९ : ६८- गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातील ८५ वर्षांवरील ११७ मतदार तसेच ४० दिव्यांग मतदार अशा एकूण १५७ मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरून मतदान करण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिले असून रविवार दिनांक १० व सोमवार ११ नोव्हेंबर रोजी गृह मतदानासाठी पथक त्यांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली, धानोरा, चामोर्शी या तीन तालुक्यांचा समावेश असून पुरुष मतदार १ लाख ५४ हजार ६१०,स्त्री मतदार १ लाख ५२ हजार ६१० व तृतीयपंथी ३ असे एकूण ३ लाख ७ हजार २२३ मतदार आहेत. यामध्ये ८५ वर्षांवरील १ हजार १३१ पुरुष व १ हजार ७४६ स्त्री असे एकूण २ हजार ८७७ मतदार आहेत. सेनादलातील २३४ पुरुष व ७ स्त्री असे एकूण २४१ मतदार आहेत. ३ लाख ७ हजार २२३ या एकूण मतदारांपैकी दिव्यांग मतदारांमध्ये १ हजार ४११ पुरुष व ९८४ स्त्री असे एकूण २ हजार ३९५ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदारांमध्ये अंध , कर्णबधिर, अस्थिव्यंग, अक्षम आदी मतदारांचा समावेश आहे. यापैकी ज्या १५७ मतदारांनी १२ डी फार्म भरून अर्ज केला ,त्यांना गृह मतदानाची सोय प्रशासनाने करून दिली आहे.
६८- गडचिरोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मतदानासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून २१ पथक गृह मतदानासाठी तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पथकात २१ केंद्राध्यक्ष,२१ मतदान अधिकारी व २१ सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे. या २१ पैकी १७ पथक प्रत्यक्ष घरी जाऊन गृह मतदानासाठी मतदान कक्ष तयार करणार आहेत व मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. ४ पथक राखीव आहेत.मतपत्रिकेचा वापर करून १५७ मतदारांना गृह मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सर्वांनी मतदान करावे व त्यातून जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. गृह मतदान करणाऱ्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीद्वारे तसेच बीएलओ मार्फत घरी उपस्थित राहण्यास कळविले आहे.
टपाली मतपत्रिका शाखेचे पथक प्रमुख गडचिरोली नगरपरिषदचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर हे आहेत.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष आष्टीकर हे गृह मतदान व टपाली मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी लक्ष देत आहेत. यासाठी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवार,८ नोव्हेंबर रोजी नगर परिषद गडचिरोली येथे प्रशिक्षण देण्यात आले. लोकशाहीच्या या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले आहे.
———–******———