*मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मल्टिमिडीया व्हॅनद्वारे जनजागृती*
*प्रत्येक मतदाराने मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे – जिल्हाधिकारी*
गडचिरोली, दि. 11 (जिमाका): गडचिरोली जिल्ह्याने मागील निवडणूकीत ७२ टक्के मतदानाची टक्केवारी गाठली होती. येत्या विधानसभा निवडणूकीत ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक मतदाराने येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी न चुकता आपल्या मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मल्टिमिडीया व्हॅन द्वारे जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या व्हॅनला जिल्हाधिकारी कार्यालयात आज हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री दैने बोलत होते. भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्यावतीने केंद्रीय संचार ब्यूरो तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, सिस्टमॅटिक व्होटरर्स एज्युकेशन ॲण्ड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन (SVEEP) आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत मल्टिमिडीया व्हॅन द्वारे मतदार जनजागृती अभियानाला सुरूवात करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, स्विपच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, एमसीएमसीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, केंद्रीय संचार ब्युरो वर्धाचे नोडल अधिकारी संजय तिवारी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी संजय त्रिपाठी उपस्थित होते.
मतदानाची टक्केवारी कमी असलेल्या क्षेत्रात या मल्टिमिडीया व्हॅन द्वारे मतदारांमध्ये जनजागृती वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती स्विपच्या नोडल अधिकारी आयुषी सिंह यांनी दिली. सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
मतदानात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते मल्टिमिडीया व्हॅनचे फित कापून उद्घाटन करण्यात आले व हिरवी झेंडी दाखवून व्हॅनला मार्गस्थ करण्यात आले.
ही व्हॅन जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली व अहेरी या विधानसभा मतदार संघातील विविध ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी फिरणार आहे. व्हॅनमधील एल.ए.डी. टिव्हीवर विविध व्हिडीओ संदेश तसेच पत्रके नागरीकांमध्ये वितरीत करून त्यांना मतदानाच्या महत्वाविषयी माहिती सांगण्यात येणार आहे.
00000