*धर्मरावबाबांमुळेच रस्त्यासाठी एक हजार कोटी : ना.नितीन गडकरी*

18

*धर्मरावबाबांमुळेच रस्त्यासाठी एक हजार कोटी : ना.नितीन गडकरी*

 

*आष्टी-सिरोंचा मार्गामुळे बदलणार परिसराचा चेहरा मोहरा*

 

अहेरी. अहेरी मतदार संघाच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास घेऊन आता पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांची स्थानिक जनतेच्या हितासाठी सुरू असलेली धडपड आणि जनहितासाठी तत्पर भूमिका प्रेरणादायी आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या या कार्यामुळेच आष्टी ते सिरोंचा या १४० किमीच्या रस्त्यासाठी एक हजार कोटी रुपये निधी देण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन व महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

 

अहेरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रचार सभेमध्ये शुक्रवारी (ता.१५) आष्टी येथे नितीन गडकरी बोलत होते. मंचावर धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

 

सभेमध्ये बोलताना गडकरी यांनी धर्मरावबाबा आत्राम यांनी मागणी केल्याप्रमाणे आष्टी ते सिरोंचा या १४० किती च्या रस्त्यासाठी १ हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले. हा निधी केवळ आत्राम यांची विकासाप्रती असलेली धडपड आणि कामासाठी सातत्याने करत असलेला पुढाकार यामुळेच देत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आवर्जून नमूद केले.

 

गडचिरोली जिल्हा, आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी जिल्ह्याला विपूल वन आणि खनिज संपदेचे वरदान लाभले आहे. विदर्भात सर्वाधिक खनिज संपदा असलेल्या या जिल्ह्यात उत्तम पायाभूत सुविधांची निर्मिती व्हावी यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांनी आमदार आणि मंत्री म्हणून घेतलेला पुढाकार हा उल्लेखनीय आहे. आदिवासी समुदायाच्या सक्षमीकरणासाठी बाबांनी अनेक उत्तम पुढाकार घेतल्याचेही गडकरी म्हणाले. निसर्ग संपदेवर आधारित उद्योगांमुळे जिल्ह्यात भरभराट येणार आहे. धर्मरावबाबांच्या पुढाकारामुळे आज सूरजागड सारख्या लोहखनीज प्रकल्पामुळे हजारो आदिवासी युवकांना रोजगार मिळाला आहे. गोरगरीब आदिवासी समुदायाच्या जीवनात सुलभता निर्माण करणारे प्रकल्प राबवून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान हास्य निर्माण करणे हे खरे राजकारण आहे. यामध्ये धर्मरावबाबांनी आपली छाप सोडली आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.

 

रस्ते हे विकासाचा आत्मा आहे असे म्हणतात. कोणत्याही क्षेत्राचा सर्वांगिण विकास साधताना रस्त्यांचे बळकटीकरण हे अत्यंत आवश्यक आहे. अहेरी, आष्टी, सिरोंचा या भागातील विकासाला गती देण्यासाठी येथील रस्त्यांचे बळकटीकरणाची गरज धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली होती. ती दूर करून त्यासाठी तब्बल एक हजार कोटीच्या भरघोष निधीची उपलब्धता करून देण्यात येत आहे. या रस्त्यामध्ये अनेक वन विभागाशी संबंधित अडचणी देखील असल्यामुळे त्या सोडविण्यासाठी आपण स्वत: लक्ष देणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.