आदिवासींचा जीवनसंघर्ष : ‘का? रक्त पिता गरीबाचे’ नाटक. प्रा.राजकुमार मुसणे ,गडचिरोली 

41

आदिवासींचा जीवनसंघर्ष

: ‘का? रक्त पिता गरीबाचे’ नाटक.

 

प्रा.राजकुमार मुसणे ,गडचिरोली

 

स्वातंत्र्याची छयाहत्तर वर्ष उलटले असले तरी मात्र समाजातील वेगवेगळ्या उपेक्षित गटातील अन्याय, अत्याचार अजूनही संपलेला नाही .भारतीय समाजात मूलनिवासी आदिवासी समाजाचे स्थान अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे .वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती व मुक्त जीवन पद्धतीने जगणारा निसर्गप्रेमी आदिमांच्या जीवनातील प्रश्नांना वाचा फोडणारे नाटक म्हणजे ‘का? रक्त पिता गरिबाचे !’हे नाटक होय.

बांबू प्रशिक्षण केंद्र मंडळ निंबाळा ,जि.चंद्रपूर यांच्या सौजन्याने ५ डिसेंबर २४ ला राजेंद्र ढोले यांच्या पटांगणात बंद शामियानात आयोजित चंद्रकमल थिएटर्स वडसा निर्मित संजय ठवरे लिखित ,निर्माता प्रा. डॉ. शेखर डोंगरे, दिग्दर्शित का ? रक्त पिता गरिबाचे ‘ हे सामाजिक, ज्वलंत विषयाला स्पर्श करणारे नाटक पाच डिसेंबरला यशस्वी रित्या संपन्न झाले.

तीन अंकी पंधरा प्रवेशी संगीत का? रक्त पिता गरिबाचे’ या नाटकातून आदिम जीवनातील अन्याय, अत्याचाराचा टाहो व्यक्त करण्यात आला आहे. जल, जंगल ,जमीन आपल्या हक्काची ,नाही कुणाची ..आम्ही मूलनिवासी या देशाचे असेच आपले हक्क व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या आपल्या आदिवासी समाजाच्या व कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या केशव आत्राम या आदिवासी कुटुंबाची कहाणी म्हणजेच हे नाटक आहे.

गरजेसाठी आवश्यक लाकूड तोडणाऱ्या कामगारांना वनाधिकारी पकडतो इथून सुरू झालेले हे नाटक शेवटी ‘मत लढो आदिवासीयोंको लढना मुश्किल हो जायेगा, ऐसा इतिहास बनायेंगे की पडना मुश्किल हो जायेगा’ या एकनाथ (डॉ.डोंगरे) संदेशाने नाटक संपते.

 

केशव प्रल्हाद आत्राम हा सामान्य आदिवासी आपल्या भावाच्या शिक्षणासाठी धडपडणारा ,तो उच्चशिक्षित व्हावा यासाठी पदरमोड करणारा प्रसंगी निसर्गा धिष्टित विविध कामे करून उपजीविका भागवणारा जंगलातील लाकडे तोडताना वन अधिकारी लागतो इकबाल त्याची कानउघाडणी करीत जंगलातील वनसंपदेचे तस्करी करणाऱ्या विक्रम अण्णा व त्याच्या खुषकीच्या मार्ग विषयीची माहिती जाणून घेतो. विक्रम अण्णाचा लाकडाचा ट्रक पकडल्यामुळे व वारंवार सांगूनही आमिषाला बळी न पडणारा प्रामाणिक वनाधिकाऱ्याचे कर्तव्य तत्परता अहंकारी गुंड प्रवृत्तीच्या विक्रम अण्णाला सहन होत नाही. तो ब्राऊन शुगरच्या खोट्या आरोपात फसवतो. विक्रम अन्नाचा लहान भाऊ सूर्यकांतअस्मितास प्रेमजाळात फसवतो. तिच्यावर अत्याचार करतो गर्भधारणेनंतर गर्भपातासाठी बळाचा वापर करतो. विक्रम अण्णा अस्मितावर बलात्कार करतो.अस्मिताच्या पोटात वाढत असलेल्या गर्भावर लाथ मारत तिची निर्भत्सना केली जाते. केशव आत्रामचा लहान भाऊ अजय हा ध्येयनिष्ठेने प्रतिकुलतेवर मात करीत एमपीएससी उत्तीर्ण करून पोलीस अधिकारी बनतो. अजय मधील होतकरू व कृतिशीलता विक्रम अण्णाची बहिण प्रगतीला आकर्षित करते. परंतु गरीबाची किळस करणारा गरीब कुटुंबाचें नाते कदापिही मान्य न करणारा विक्रम अण्णा विरोध करतो आणि इथूनच संघर्ष नाट्य वाढत जाते. विक्रम अण्णाचा ड्रायव्हर चतुर एकनाथ उईकें विक्रम अण्णाचे क्रूरकर्म, दुष्कृत्य, आदिवासीवरील अत्याचार त्याला पहावत नाहीत, ही जुलमी अत्याचारी व्यवस्था उलथवून टाकण्याकरिता तो विशिष्ट प्लॅन करतो आणि त्यात रवी व पूजाला सहभागी करून घेतो.विक्रम अन्नाचे वर्चस्व झूगारात गाफीलीने स्टॅम्प पेपरवर विक्रम अन्नाची स्वाक्षरी घेऊन वाममार्गाने जमविलेल्या दहा पिढ्या जगतील एवढी गडगंज संपत्ती अन्यायग्रस्त अस्मिताचे नावे करून न्याय मिळवून देतो. अपमान,अत्याचार, बलात्कार अशा सर्वंकष मार्गाने शोषल्या गेलेली जगण्याचे सामर्थ्य ही न उरलेली अस्मिता अगतिकपणे खचून आत्महत्येचा विचार करते . वन अधिकारी इकबाल मात्र तिचा आत्मविश्वास वृद्धिंगत करीत ‘तुला लढायचं आहे’ हे खंबीरपणे बिंबवल्याने अस्मिता रणरागिणीचे रूप धारण करते .अन्यायाविरुद्ध बंड करून उभी होत हातात बंदूक घेऊन जुलमी विक्रम अण्णा व सूर्यकांत यांच्यावर गोळ्या झाडत ठार करते. किंबहुना स्वतःलाही संपविते.

प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ ,करारी, बाणेदार, वरिष्ठांच्या दबावाला न पडता प्रसंगी गुन्हेगारावर वचक ठेवणारा बायकामुलांचे सर्वस्व गमावल्यानंतरही खचून न जाता जिद्दीने संघर्षरत वन अधिकारी इकबाल खान (चिदानंद सिडाम), श्रीमंतीच्या बळावर अत्याचार करणारा सूर्यकांत (लोकेश कुमार), सत्ता- संपत्तीच्या बळावर अराजकता माजवत अत्याचार करणारा लाकूड तस्कर मवाली विक्रम अण्णा (विश्वास पुरके), कौटुंबिक जीवन संघर्षातून लहान भावाच्या करिअरसाठी धडपडणारा केशव आत्राम (महेंद्र गोंडाने) प्रतिकुलतेतून यशस्वी स्वप्नपूर्ती करणारा अजय आत्राम (स्वप्निल बनसोड,), जे योग्य आणि चांगले आहे त्याचा पुरस्कार करणारी समतावादी न्यायप्रिय प्रगती (ज्ञानेश्वरी प्रभाकर),तडजोडीने कुटुंब सांभाळणाऱ्या कमलाचे(मनिषा देशपांडे) एकीकडे अजयचें करीअर तर दुसरीकडे अस्मिताचे दिवस जाणे याचें द्वंद्व, सूर्यकांतच्या प्रेमाला बळी ठरत सर्वस्व गमावलेल्या अस्मिताचा (अभिनयसम्राज्ञी पौर्णिमा तायडे) आक्रोश व बंडकारी उलगुलानी रणरागिणित्व, एल्गार, नाट्य गतिमान करणारा चतुर सूत्रधार एकनाथ(नटसम्राट प्रा.डॉ.शेखर डोंगरे), विलक्षण अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीला खेळवत ठेवणारा विनोदवीर रवी (निवृत्त प्राचार्य के .आत्माराम), बिनधास्त अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्याची पापणीही पडू न देणारी सदाफुली पूजा (पायल) या कसदार कलावंतांच्या चतुरस्त्र अभिनयाने नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या साकार झाले..

कर्तव्यनिष्ठ वन अधिकारी इकबालचा बाणेदारपणा,सूर्यकांत -अस्मिता यांचा रोमान्स, सुपीक डोक्याच्या एकनाथ उईकेचे बुध्दीचातुर्य अन् अजब प्लॅन, त्याच्या प्लॅनला साथ देणारा वेशांतरी रवीना ठूसठूस आणि रंभा यांची करामत, उच्च -नीच, श्रीमंत – गरीब भेद न मानता माणुसकीने वागणारी, नात्यापेक्षा न्यायालामहत्व देणारी पत्रकार प्रगती आणि अजय यांच्यातील मधुर संबंध, गरीब आदिवासी कुटुंबातील होतकरू अजयची करिअर झेप, जुलमी अन्यायी अत्याचारी , इक्बाल खानला ब्राऊन शुगरच्या खोटे आरोपात अडकवून फसवणारा,अनेकाना आयुष्यातून उठवणारा,कुटुंबे उध्वस्त करणारा अन्यायी लाकूड तष्कर, श्रीमंतीचा माज असलेला अहंकारी गुंड विक्रम अण्णा, मायाजाळात अडकवून अत्याचार करणारा सूर्यकांत, केशव आत्रामचे आक्रंदन, आर्त टाहो, पक्षाघातानंतरचा जिवंत अभिनय, हतबल अस्मिताचा अस्वस्थपणा, तडफड, तगमग, आक्रोश , विक्रम अण्णांनी किशोर ठेवलेल्या विचित्र अटी,

एकनाथ- रवी- पूजा या विनोदी त्रिकुटातील प्रचंड हजरजबाबीपणा, उत्स्फूर्त शाब्दिक कोट्या, इरसाल संवाद, चेष्टा, मस्करी, लगट, चेहऱ्यावरचे झपाट्याने बदलणारे हाव भाव, शेरो शायरीची जुगलबंदी, लग्नाळूपणा, विविध किस्से यामुळे नाट्यप्रयोग खुलत, बहरत जात हसून लोटपोट होण्यासाठी व अनुभवण्यासाठी ‘का ?रक्त पिता गरिबाचे ‘हे नाटक पाहायलाच हवे असे आहे.

 

नाटकातील विनोद वैशिष्ट्यपूर्ण आहे. अगोदर, गरोदर, परमानंद, हिशोब न जुळणे, सोड ,काढ ,रमदाडून ठेवतो, बावरेला, झोलाझेंडी, मै हु- मै नही हु या शब्दातील मजा चाखण्यासाठी व सुई टोचल्यावर रक्त का बर येतो? या प्रश्नाच्या उत्तरासाठी हे नाटक प्रत्यक्ष पाहायलाच हवे.

नाटकात ‘झुळूक आली वाऱ्याची हाती हात देना, तुझ्या मनातून माझ्या मनात प्रीतीचा वाहू दे झरा, साजणी ग झालो मी दिवाना, केलाय डीजे चालू ,शालू नाच नाच, उपाशी राहून, जागं झालं सारं गाव ,आभाळ हे फाटलं या गीतांमुळे चांगलीच रंगत प्रयोगात आली. नाटकातील संवाद ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विक्रम अण्णा:’जल से पतला और भूमी से भारी हो सकता है कौन, अगुनसे तेज और काजल से काला हो सकता है कौन,हम बदलते है कानून, हमे पकड सकता है कौन”, प्रगती: ‘कायद्याचं रक्षण करण्यासाठी कायदा हातात घेणे म्हणजे कायद्याचं उल्लंघन होय’, केशव आत्राम:’ गरीबाचा कुणी वाली नाही,का ?रक्त पिता गरिबाचे’ यासारख्या खटकेबाज प्रभावी संवादामुळे नाटकातील प्रसंग जिवंत होत अंतर्मुख करतात.

 

प्रसंगानुरूप प्रवेशाकरिता केलेला तुटपुंज्या नेपथ्यावरील पडद्याचा समर्पक वापराने नाटय साकार होते. सामाजिक प्रश्न -समस्याशी निगडित नाट्याशय, श्रवणीय संगीत, आल्हादक वादन, स्वरबहार स्वप्निल बन्सोड व लोकेश यांचे सुमधुर गायन व झाडीपट्टीतील नावाजलेल्या कसदार कलावंतांचा अभिनय यामुळे नाटय प्रयोगात सरसता आली आहे.

 

ऑर्गन रक्षितकुमार रामटेके ,तबला हिरा मडावी , ॲक्टोपॅड धम्मदीप सोनटक्के यांची प्रसंगानुरूप संगीतसाथ,विजय साऊंड सर्व्हिसची उत्तम ध्वनी व्यवस्था, हर्षल, प्रतीक आर्टची रंगभूषा, मिलिंद गोंगले, सुहास मंडलवार व नागसेन मेश्राम यांचे नाट्यप्रयोगासाठीचे सहाय्य महत्त्वपूर्ण ठरले.

एकंदरीत आदिवासींच्या जीवनसंघर्षाची व्यथा, प्रश्न, दाहकता ,अन्याय ,अत्याचार, अपमान, सूड विक्रम अणाची तस्करी, दबावतंत्र, फसवणूक, इक्बालचा प्रामाणिकपणा ,केशवची जगण्याची धडपड, अस्मिताची अवहेलना व तडफड, अजयची जिद् व यशस्वी भरारी, अस्मिता व एकनाथचा अन्यायाविरुद्धचा एल्गार म्हणजेच ‘का? रक्त पिता गरिबाचे!’ हे नाटक होय.

 

प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली