गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात ८ महिन्याची गर्भवती महिला ठार
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून १५ किलोमीटर अंतरावरील चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत कुरखेडा (सावरगाव) गावाजवळच्या शेतात काम करीत असलेल्या एका महिलेला शुक्रवार ६ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास वाघाने ठार केले. शारदा महेश मानकर (२६) रा. कुरखेडा, ता. गडचिरोली असे मृत महिलेचे नाव आहे. शारदाला एक ३ वर्षांचा मुलगा असून, ती ८ महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती आहे.
मानकर यांचे शेत कुरखेडा गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असून, ते खंड क्रमांक ४११ मधील जंगलाला लागून आहे. मानकर यांच्या शेतातील धानाचे चुरणे नुकतेच आटोपले. त्यामुळे खळ्यावर राहिलेले धान गोळा करण्यासाठी शारदा मानकर ही शेतावर गेली होती. धान पाखळत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. यात ती जागीच गतप्राण झाली. तिच्या ओरडण्याचा आवाज येताच शेजारच्या शेतातील महिला धावून आल्या. मात्र, तोपर्यंत वाघाने पोबारा केला
घटनेनंतर चातगावचे वनपरिक्षेत्राधिकारी आणि अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संध्याकाळी उशिरा मृतदेह गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. त्या परिसरात वाघाचा वावर असून, दवंडी देऊन नागरिकांना आधीच सतर्क करण्यात आले आहे, असे वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी सांगितले
शारदा व महेश मानकर यांना तीन वर्षांचे एक मूल आहे. आता दुसऱ्यांदा शारदा ह्या ८ महिन्यांच्या गर्भवती हाेत्या. घरातील सर्व कामे करून शेतीकामातही त्या महेश यांना मदत करीत असत. वाघाच्या हल्ल्यात त्या ठार झाल्याने तीन वर्षीय मुलाचे मातृछत्र कायमचे हरपले