संताजी जगनाडे महाराजांचे विचार तेली समाजासाठी प्रेरणादायी

35

संताजी जगनाडे महाराजांचे विचार तेली समाजासाठी प्रेरणादायी

मान्यवरांचे मनोगत, आ. डॉ. मिलिंद नरोटे, न्या. तरारे, डॉ. देवराव होळी आदींची उपस्थिती

गडचिरोली : आजच्या आधुनिक युगातही श्रीसंत संताजी जगनाडे महाराजांचे विचार तेली समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले.

 

श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणचे अध्यक्ष न्या. प्रमोद तरारे, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर वासेकर, सचिव सुरेश भांडेकर, उपाध्यक्ष प्रमोद पिपरे, तेली महासभेचे कार्याध्यक्ष देवाजी सोनटक्के, संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी, उपाध्यक्ष ॲड. रामदास कुनघाडकर, संतोष खोबरागडे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, बाबूराव कोहळे, राजेश इटनकर, विष्णू कांबळे, सुरेश निंबोरकर, अनिल कोठारे, गोपीनाथ चांदेवार, भगवान ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

 

सत्कारमूर्ती नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तेली समाजाने आपला मुलगा म्हणून मला निवडून देऊन सेवेचे संधी दिली, याचे निश्चितच सोने करेन, असे सांगून समाजाचे ऋण म्हणून संताजी स्मृती प्रतिष्ठानला १५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. न्या. तरारे यांनी सामान्य कुटुंबातून आपण न्यायाधीश झालो असून प्रत्येक विद्यार्थ्याने आयुष्यात ध्येय ठेवले तर उद्दीष्ट साध्य केले जाऊ शकते, असे सांगितले. माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी तेली समाज विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे, यासाठी आजपर्यंत कार्य केले असून जोपर्यंत समाज एकत्र येणार नाही, तोपर्यंत विकास होणार नाही. आपल्याला आजपर्यंत ७० ते ८० टक्के तेली समाजबांधवांनी निवडणुकीत मतदान करून मानसन्मान दिला. त्यामुळे मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात ३५ लाख रुपयांचा निधी संताजी स्मृती प्रतिष्ठानच्या विकासासाठी खर्ची केल्याचे सांगितले.प्रभाकर वासेकर यांनी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संताजी स्मृती प्रतिष्ठानला १० लाख रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले असून या आधीसुद्धा माजी खासदार हंसराज अहिर, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी आदींनी दिलेल्या मदतीमुळे संताजी भवनाची निर्मिती झाल्याची माहिती दिली. प्रमोद पिपरे यांनी तेली समाजाने अश्या सार्वजनिक कार्यक्रमांमधून आपली ताकद दाखविण्याची आवश्यकता विशद केली. तर योगिता पिपरे यांनी देशात अनेक ठिकाणी तेली समाज विखुरला आहे. संताजींचे विचार जोपर्यंत समाजातील लोकांना कळणार नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. राजकारणात पदे येतात व जातात, मात्र सामाजिक दृष्टिकोनातून काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त तेली समाजबांधवांनी शहरातून भव्यदिव्य शोभायात्रा काढली होती. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तेली समाजाचे अध्यक्ष रवींद्र निंबोरकर, उपाध्यक्ष रमेश कांबळे, मोहन दिवटे, मनोहर भांडेकर, भगवान ठाकरे, घनशाम लाकडे, प्रफुल्ल आंबोरकर, भय्याजी सोमनकर आदींनी परिश्रम घेतले.