*_क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारेच उघडली नाही तर समाजातील अनिष्ट प्रथा , परंपरा दुर करण्यासाठी जिवाचे रान केले*
*_क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती अहेरी येथे उत्साहात साजरी_*
दि. ३ जानेवारी २०२५
अहेरी :स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा मंत्र देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती तसेच राष्ट्रीय बालिका दिन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले युवा संघर्ष समिती तथा युवा शक्ती गणेश मंडळ अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख वक्ता म्हणून आधार विश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. गीता सुशील हिंगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून लाभलेल्या सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई नालमवार, रामचंद्रजी गुरनुले सेवानिवृत्त शिक्षक, उमेश मोहुर्ले उपसरपंच ग्रा. पं. वेलगुर, शालिनीताई पोहनेकर नगरसेविका न. पं अहेरी ,अशोकजी निखुरे सेवानिवृत्त शिक्षक इ. मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आधार विश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. गीता हिंगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर व स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण आणि स्वातंत्र्याचा अधिकार मिळवून दिला. सतीप्रथा ,बालविवाह, यासारख्या अनिष्ट प्रथा नष्ट केल्या. विधवांचे केशवपन बंद करण्यासाठी नाव्ह्याचा संप सुध्दा पुकारला. अश्याप्रकारे शिक्षणासोबत सामाजिक क्रांती सुध्दा घडवून आणली. म्हणूनच अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या महिलांना शिक्षणाची वाट मोकळी करून देणाऱ्या सावित्रीबाईंचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत. नव्या पिढीने त्यांच्या विचारांवर चालत सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊले उचलावी.”
सौ. गीता ताई यांनी राष्ट्रीय बालिका दिनाविषयी भावना व्यक्त करत मुलींना शिक्षण, स्वावलंबन, आणि समान हक्कांसाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला अहेरी येथील बहुसंख्य महिला तसेच पुरुषांनी आपला सहभाग नोंदवून सावित्रीबाईंच्या विचारांना उजाळा दिला. कार्यक्रमाने सामाजिक बांधिलकीचे नवे विचार प्रस्थापित केले आणि स्त्री मुक्तीचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक गुरनुले तर आभार प्रदर्शन सागर गावतुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश मोहूर्ले,मयुर पिपरे , अक्षय गुरनुले, त्रिनल लेनगुरे, अविनाश गुरनुले यांनी पुढाकार घेतला.