आमटे परीवाराचे निस्वार्थ सेवाकार्य सर्वांसाठीच प्रेरणादायक
मान्यवरांचे मनोगत; पत्रकारीदिनी प्रेस क्लबतर्फे अनिकेत, समीक्षा आमटे दाम्पत्याचा सन्मान
गडचिरोली, ता. ६ : कर्मयोगी श्रद्धेय बाबा आमटे यांचा समाजसेवेचा वारसा त्यांची तिसरी पिढी समर्थपणे चालवत आहे. श्रद्धेय बाबा आमटे यांनी रक्ताचे पाणी करून वरोरा येथे कुष्ठरोग्यांसाठी आनंदवनाच्या रूपात नंदनवन फुलवले, डाॅ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी १९७३ च्या सुमारास अतिशय निबिड अशा हेमलकसा परीसरात लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून लोकसेवेचे कार्य प्रारंभ केले. हेच समाजकार्य तिसऱ्या पिढीतील अनिकेत व समीक्षा आमटे समर्थपणे पुढे नेत आहेत. आमटे परीवाराचे हे निस्वार्थ सेवाकार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे, असे भावोद्गार मान्यवरांनी काढले.
गडचिरोली प्रेस क्लबच्या वतीने लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा (भामरागड) चे संचालक आणि समाजसेवक अनिकेत प्रकाश आमटे व समीक्षा अनिकेत आमटे यांना सोमवार (ता. ६) गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सर्वांनीच गडचिरोली जिल्ह्यात अविरत सेवाकार्य करत असलेल्या आमटे दाम्पत्याच्या सेवाकार्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर होते.कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार, लोकसत्ता विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. विशेष पाहुणे म्हणून आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व ज्येष्ठ गायक मारोतराव इचोडकर यांनी गायलेल्या महाराष्ट्र गीताने करण्यात आला. कार्यक्रमात सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी आमटे परीवारासंदर्भातील विविध रंजक आठवणी सांगताना जिल्ह्यात होऊ घातलेल्या देसाईगंज (वडसा) ते गडचिरोली रेल्वेमार्गाला लोकबिरादरी एक्स्प्रेस नाव देण्यासाठी सर्वांनीच सरकारकडे मागणी करण्याचे आवाहन केले. प्रमुख वक्ते महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी आमटे परीवाराचे सेवाकार्य समाजाला दिशादर्शक असल्याचे सांगताना पत्रकारीतेच्या क्षेत्रातील घडमोडींवरही भाष्य केले. ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांनी आमटे परीवार करत असलेल्या विविध उपक्रमांपासून सरकारनेही प्रेरणा घेऊन त्यादृष्टीने लोकहिताची कामे करणे गरजेचे असल्याचे सांगितले. नक्षलवाद संपत असल्याचे सरकार म्हणत असले तरी तेलंगणा, आंध्र प्रदेशातील अलिकडच्या घडामोडी बघता सावध राहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. आमदार डाॅ. मिलिंद नरोटे यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत पत्रकार, समाजसेवकांशी संवाद साधून या समस्यांच्या निवारणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनीही जिल्हाविकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून या जिल्ह्याला आमटे परीवाराच्या सेवाकार्याची सोनेरी किनार असल्याचा आनंद झाल्याचे सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर यांनी केले. संचालन मिलिंद उमरे, तर आभार प्रेस क्लबचे सचिव रूपराज वाकोडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी
प्रेस क्लब गडचिरोलीचे उपाध्यक्ष रोहिदास राऊत, कोषाध्यक्ष शेमदेव चापले, सहसचिव सुरेश नगराळे, सदस्य सुरेश पद्मशाली, नंदकिशोर काथवटे, निलेश पटले, विलास दशमुखे, मनोज ताजने, सहयोगी सदस्य नंदकिशोर पोटे, इरफान पठान, आशीष अग्रवाल, मनिष कासर्लावार, मनिष रक्षमवार, रोमित तोम्बर्लावार, संदीप कांबळे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गीतगायन स्पर्धेचे पुरस्कार वितरण…
पत्रकारदिनानिमित्त प्रेस क्लबच्या वतीने गीतगायन स्पर्धेचेसुद्धा आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात स्पर्धेतील विजेत्यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच स्पर्धेचे परीक्षण करणारे श्री.धात्रक व मारोतराव इचोडकर यांनाही सन्मानित करण्यात आले.
——————————————-