अंगणवाडी स्वयंपाकी महिलांची वेठबिगारी थांबवावी
स्वतंत्र मजूर युनियनची मागणी
गडचिरोली—डॉ.ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांना फक्त १,००० रुपये दरमहा मानधन देऊन शासन या महिलां कडून एक प्रकारे वेठबिगारी करवून घेत आहे. ही वेठबिगारी त्वरित थांबविण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र मजूर युनियन चे जिल्हा सरचिटणीस गौतम मेश्राम यांनी केली आहे.
उत्तर गडचिरोली जिल्ह्याच्या स्वयंपाकीन महिलांचा मेळावा कुरखेडा येथे नुकताच आयोजिण्यात आला होता त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते तर सामाजिक कार्यकर्ते तुलाराम राऊत, स्वयंपाकीन महिला संगठनेचे नेते कृष्णा चौधरी हे प्रामुख्याने हजार होते.
सदर स्वयंपाकीन महिला मागील नऊ वर्षांपासून १,००० रुपये एवढया अत्यल्प मानधनावर काम करून गरोदर मातांची सेवा करीत आहेत. ऊन, वारा, पाऊस या सर्व दिवसात त्या आपले काम नियमितपणे करीत असून वारंवार मागणी करूनही अजूनपर्यंत त्यांचे मानधन वाढविण्यात आलेले नाही, हा या महिलांवर खूप मोठा अन्याय आहे.
तेंव्हा शासनाने त्याचे मानधन त्वरित वाढवून द्यावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणीही मेश्राम यांनी यावेळी केली. स्वतंत्र मजूर युनियनतर्फे या समस्ये बद्दल आवाज उचलण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले.
रोहिदास राऊत यांनीही यावेळी मार्गदर्शन करून स्वयंपाकीन महिलांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शासन स्वतःच आपल्या किमान वेतन कायद्याला हरताळ फासत असून ग्रामीण व गरीब महिलांसोबत क्रूर थट्टा करीत असल्याचे ते म्हणाले. शासनाने हि थट्टा त्वरित थांबवावी आणि महिलांना न्याय द्यवा अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
तुकाराम राऊत यांनी महिलांचे संघटन पुन्हा मजबूत करण्याचे व या अन्याया विरुद्ध आवाज उचलण्याचे आवाहन केले. महिला संघटनेचे कृष्ण चौधरी यांनी प्रास्ताविकातून अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांच्या समस्या मांडल्या आणि या मागण्या पुढे रेटण्यासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला.
अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांचे मानधन किमान २०,००० रुपये एवढे वाढविण्यात यावे, त्यांचे मानधन नियमितपणे दरमहा देण्यात यावे, या महिलांचे स्वतंत्र मस्टर बुक ठेवण्यात यावे, साप्ताहिक सुटी देण्यात यावी, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, पेन्शन लागू करण्यात यावे इत्यादी मागण्यांचे ठराव मेळाव्यात पारित करण्यात आले.
या मेळाव्याला आरमोरी, वडसा कुरखेडा कोरची व धानोरा या पाच तालुक्यांतून दोनशेहून अधिक महिला कामगार उपस्थित होत्या.
दिपाली बावनथडे, संध्या लोंबले, वैशाली नरोटे, वैशाली मडावी, ममता नाकाडे, गायत्री सयाम सीमा गोटा, शकुंतला गावडे, अश्विन गुरनुले, रीमा नैताम , शारदा बर्डे, अंजु गेडाम व अन्य महिलांनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.