माहिती संचालक गणेश मुळे यांचा प्रेस क्लब तर्फे सत्कार

13

माहिती संचालक गणेश मुळे यांचा प्रेस क्लब तर्फे सत्कार

गडचिरोली… माहिती व जनसंपर्क खात्याचे संचालक गणेश मुळे हे गडचिरोली येथे दौऱ्यानिमित्त आले असता जिल्हा माहिती कार्यालयात त्यांचा प्रेस क्लब तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष अविनाश भांडेकर, उपाध्यक्ष रोहिदास राऊत, सचिव रूपराज वाकोडे, सहसचिव सुरेश नगराळे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव आदी उपस्थित होते यावेळी गणेश मुळे यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. तसेच येणाऱ्या काळात जिल्ह्याचा विकास जलद गतीने घडवून आणण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याविषयी मत जाणून घेतले, त्याचबरोबर आजची पत्रकारिता आधुनिकतेशी जोडण्यासाठी नवीन माहिती तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल व यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग काय मदत करेल याविषयी माहिती दिली. जिल्ह्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळा व अभ्यास दौऱ्याबाबतही सखोल चर्चा केली. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांना अधीस्वीकृती कशी देता येईल याबाबत त्यांनी विचार मांडले. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेसाठी स्वतंत्र कक्ष असावा यासाठी काय करता येईल याबाबत जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या. अनेक शासकीय कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती असताना जिल्हा माहिती कार्यालयासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडून शासकीय जागा मिळवून इमारत उभी करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.