शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थ्यांना क्विक हिल फाउंडेशन राष्ट्रीय सायबर सुरक्षा पुरस्काराचे राज्यपालांच्या हस्ते वितरण.
अकोला :- स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘सायबर सुरक्षेकरिता सायबर शिक्षण’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे येथे आयोजित या समारंभाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, महाराष्ट्र सायबरचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे, क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास काटकर, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर उपस्थित होते. सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या अभियाना अंतर्गत यावर्षी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या वीस विद्यार्थ्यांनी अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जावून कार्यशाळेत जनजागृती केली. यामध्ये नव्वद हजार विद्यार्थी आणि जनतेला सायबर सुरक्षेसाठी अवगत केले. या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रीय स्तरावरील 5 पुरस्कार महाविद्यालयाला प्रदान करण्यात आले. यामध्ये सर्वोत्कृष्ट शिक्षक उपविजेता पुरस्कार डॉ. हरिदास खरात, सर्वोत्कृष्ट टीम विजेता पुरस्कार अनिकेत बुडके व सुमित सपकाळ, सर्वोत्कृष्ट पी. आर. मिडिया डायरेक्टर उपविजेता पुरस्कार वैष्णवी बेलांगे व सर्वोत्कृष्ट कम्युनिटी डायरेक्टर विजेता प्रणाली पिंपळकर यांना प्रदान करण्यात आला. शीतल साखरे आणि रोहन सर्जेकर ह्यांना क्रिएटिव्ह टीम सदस्य म्हणून प्रमाणपत्र मिळाले. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्वामी विवेकानंदांची शिकवण लाखो लोकांना, विशेषतः तरुणांना प्रेरणा देत असते. आजच्या या डिजिटल इंडिया मध्ये सायबर गुन्हेगारी ही एक गंभीर समस्या झाली असून त्या बाबतीत सुरक्षित यंत्रणा उभारणे आणि सुरक्षा जागृती करणे हे अत्यंत महत्त्वाचे झालेले आहे. क्विक हील फाउंडेशनने आयोजित केलेल्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा पुरस्कारांमध्ये युवकांसोबत सामील होताना आनंद होत आहे असे प्रतिपादन केले. युवकांना सोबत घेऊन क्विक हील फाउंडेशन ने सायबर वॉरियर्सची टीम बनवून जी सायबर सुरक्षा जनजागृती केली ती मोलाची असल्याने त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. क्लिक हील च्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांनी सायबर शिक्षा हा उपक्रम लोकांच्या सुरक्षेसोबतच विद्यार्थ्यांना सक्षम करणे आणि नेतृत्व तयार करणे यासाठी राबविला जात आहे असे सांगून सर्व वॉरियर्सचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. साबू ह्यांनी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, सायबर वॉरियर्स उपस्थित होते. महाविद्यालयातील पुरस्कार विजेत्यांचे शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. ताराताई हातवळणे, सचिव श्री गोपाल खंडेलवाल, नाना कुलकर्णी, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.