रोड सेफ्टी इन्फोर्समेंट व्हेईकलचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते लोकार्पण

113

रोड सेफ्टी इन्फोर्समेंट व्हेईकलचे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते लोकार्पण

गडचिरोली,(जिमाका)दि.09: – आरटीओ चे तपासणी वाहन रस्त्यावर आले कि दंडात्मक कारवाईचे केली जाते असा दृढ समज जनमानसांत परिचीत आहे. परंतु दंडात्मक कारवाईशिवाय अपघातग्रस्त वाहनांस तातडीची मदत, रस्तावरील सुरक्षितता वाढीस लागावी म्हणून लोकशिक्षण व जनजागरण तसेच आरटीओ विभागासंबधी लायसन्स व वाहननोंदणी सारख्या सेवा लोकांना सहज व सुलभरित्या प्राप्त व्हावात म्हणून जिल्हा नियोजन समिती , गडचिरोली मार्फत आरटीओ गडचिरोली कार्यालयास या सर्व सोयी असलेले अत्याधुनिक वाहन उपलब्ध करुन दिले जात आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले. वाहनाच्या लोकार्पण समयी ते बोलत होते. सदर वाहनाचा वापर गडचिरोली जिल्हयातील ग्रामीण भागातील जनतेला व्हावा यासाठी आज जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी टी.एस. तिडके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, मोटार वाहन निरीक्षक सचिन जमखंडीकर, चेतनकुमार पाटील, योगेंद्र मोडक, प्रभाकर सावंत, हेमंत गांवडे, व पोलीस निरीक्षक श्री. मंडलवार, कार्यालातील कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते.

गडचिरोली जिल्हा हा संपूर्णतः जंगलव्याप्त, आदिवासीबहुल, अतिदुर्गम व नक्षलप्रभावित असल्याने या जिल्ह्यात बहुसंख्य असणा-या आदिवासी बांधवांना लायसन्स व वाहननोंदणीची कामे थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविता यावी म्हणून विशेष केंद्रिय सहाय्य योजनेमधुन, अत्यावश्यक सेवेची विशेष बाब ध्यानात घेऊन, वाहनावर सर्व अत्याधुनिक सेवा उपलब्ध करुन, यासेवेपासुन वंचीत वर्गाला लाभ मिळवुन देणे, अपेक्षित होते यादृष्टिने सदर वाहन अत्याधुनिक सोयी सुविधेसह तयार करण्यात आले. सदर वाहनामध्ये GPS ट्रॅकरपासुन तर अतिवेगवान धावणा-या
वाहनांवर कारवाईसाठी Speed Gun डिव्हाईस बसविले आहे. तसेच वाय-फाय फॅसिलीटी सह एकाच वेळी किमान दहा अर्जदारांना टॅबव्दारे ऑनलाईन लर्निंग लायसन्सची परिक्षा देता येईल.
त्याचबरोबर वाहन नोंदणी व वाहनकर भरण्याची सुविधा, ई-चालन सुविधा सुध्दा उपलब्ध करण्यात आली आहे. याशिवाय जनतेस विभागाची कार्यपध्दती, रस्ता सुरक्षाविषयी प्रबोधन व वाहनाची
देखभाल व निगा याची माहिती देण्याकरिता दृकश्राव्य यंत्रणा (LCD प्रोजेक्टर) वाहनासोबत उपलब्ध
केलेले आहे. तसेच अपघातामुळे रस्त्यावर निर्माण झालेला अडथळा किंवा अपघातग्रस्त वाहनास तातडीची मदत करता यावी म्हणून वाहनास टोवींग डिव्हाईस व विंच केबल बसविले आहे. यासोबतच सदर वाहन रस्त्यावर तपासणीस असतांना रस्त्यावरील सर्व हालचाली चित्रीत करण्यासाठी डॅश कॅमेरा
बसविण्यात आला आहे. यासर्व सोयीसुविधा बघता गडचिरोली जिल्ह्यास उपलब्ध झालेले रोड सेफ्टी इन्फोर्समेंट व्हेईकल हे राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिले वाहन असावे. तसेच आरटीओ विभागाच्या कार्यपध्दतीची दिशा नुसतीच दंडात्मक कार्यवाही नसुन लोकशिक्षण, सेवा, अपघातग्रस्तांना मदत या
बहुआयामी पध्दतीने निर्देशित केली जाईल. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, आपल्या
सेवेसाठी लोकार्पीत वाहनाचा लाभ घेण्यासाठी विभागाच्या पारदर्शक कार्यपध्दतीस स्वतः पुढाकार
घेवून सहकार्य द्यावे.