*विकासाच्या सकारात्मक बाबी आपल्या क्षेत्रात लागू करण्याचा प्रयत्न करा*
*आदिवासी युवा विनिमय कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांचे युवांना मार्गदर्शन*
*नेहरू युवा केंद्राद्वारे ५० युवक हैदराबादला रवाना*
गडचिरोली दि.24 : “आदिवासी युवा विनिमय कार्यक्रमाद्वारे तुम्हाला विविध क्षेत्रातील उच्च मान्यवरांशी भेट घेण्याची संधी मिळणार आहे. तुम्हाला भेटलेले व्यक्तिमत्व आणि त्यांची विचारधारा यामुळे तुमच्या विचारशक्तीमध्ये तसेच व्यक्तिमत्वामध्ये नक्कीच बदल होईल. ह्या बदलांचे निरीक्षण करा. त्याचप्रमाणे हैदराबाद येथील विकासात्मक कामकाज पहा. त्या ठिकाणी झालेल्या विकास कार्यांची माहिती तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांपर्यंत आणि स्थानिक समुदायांपर्यंत पोहचवायची आहे. विकासाच्या सकारात्मक बाबी तुमच्या गावांमध्ये लागू करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही इथे आलेला आहात म्हणजेच तुमच्यात खूप मोठी क्षमता आहे. या संधीचा सदुपयोग करा आणि भविष्यात तुमच्या क्षेत्रातील एक उत्कृष्ट नेतृत्व म्हणून उभे राहा.” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी युवकांना केले.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केन्द्र गडचिरोली व केंद्रीय रिजर्व पोलिस दल यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ५० आदिवासी युवकांची ६ वी तुकडी हैदराबाद येथे २४ ते ३० जानेवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या १६ व्या आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आली. त्यानिमित्त आयोजित प्रस्थान कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमा प्रसंगी डेप्युटी कमांडंट सुमित वर्मा तसेच माविम गडचिरोली चे कार्यक्रम समन्वय अधिकारी श्री झाडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार केंद्रीय पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक यांनी मानले.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड आणि एटापल्ली विभागातील एकूण 50 उमेदवार या तुकडीत समाविष्ट आहेत. 2024-25 या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 450 आदिवासी युवकांना पोलीस महानिरीक्षक¸ पश्चिम विभाग केंद्रीय राखीव पोलीस दल, नवी मुंबई¸ केंद्रीय राखीव पोलीस दल गडचिरोली आणि नेहरू युवा केंद्र¸ गडचिरोली. भारतातील विविध 09 ऐतिहासिक शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने पाठवले जाणार आहे. केंदीय रिझर्व्ह पोलीस दल आणि नेहरू युवा केंद्र संघटना आदिवासी युवकांच्या विकासासाठी आणि त्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी 2006 पासून आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित करत आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणे आणि त्यांना विविधतेतील एकतेची संकल्पना आत्मसात करणे, त्यांना विकासात्मक उपक्रम आणि औद्योगिक प्रगतीची जाणीव करून देणे आणि आदिवासी तरुणांना इतर क्षेत्रात प्रवृत्त करणे हा आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये घटनात्मक अधिकारी, मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद सत्रे, पॅनल चर्चा, व्याख्यान सत्र, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम, वक्तृत्व स्पर्धा, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शनाशी संबंधित उद्योग भेटी, महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटींचा समावेश आहे.
000