*पशुसंवर्धन विभागाच्या 100 दिवस आराखड्याचे सादरीकरण*

15

*पशुसंवर्धन विभागाच्या 100 दिवस आराखड्याचे सादरीकरण*

 

*पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा*

 

*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

 

मुंबई, दि. 27 – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पशुसंवर्धन विभागाच्या 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी यांनी सादरीकरण केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पाळीव प्राणी जखमी झाल्यास अथवा त्यांच्या आजारपणात उपचारासाठी पशुसंवर्धन विभागाकडे तज्ज्ञ उपलब्ध असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. तसेच पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाची रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करावी. पशुसंवर्धन व्यवसायाला कृषि व्यवसायाचा दर्झा देण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गायी पैदासीसाठी स्वतःची यंत्रणा उभारावी. तसेच गायी पैदासीसाठी शेतकऱ्याचा सहभाग घ्यावा. तसेच चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा व्यवस्थापन करावे. चारा उत्पादनासाठी जमीनींची उपलब्ध करून घेऊन उत्पादन वाढवावे. विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविताना इतर विभागांचेही सहाय्य घेण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केल्या.

शेळ्यांमधील देवी/लंपी चर्मरोग प्रतिबंधक लस निर्मिती लवकर करण्यात यावे. राष्ट्रीय संदर्भ लस चाचणी प्रयोगशाळा लवकर कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे. लाळ खुरकत व पीपीआर प्रतिबंध लसीकरण मोहिम राबवावी. बर्ड फ्ल्यूसारखे रोग पसरू नयेत, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

राज्यातील विविध क्षेत्रात बदल झाल्यामुळे पशुप्रजनन धोरणात कालानुरुप बदल करणे आवश्यक असून त्यानुसार नवीन धोरण निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच पशुपालन व्यवसायात लोकसहभा वाढविण्यासाठी पशुवैद्यकीय संस्था पातळीवर अभियान राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी यावेळी उपस्थित होते.

०००००